जुलैत मुसळधार; राज्यात १०६% कोसळणार;देशात ९४ ते १०६ टक्‍के: हवामान विभागाचा जुलैचा अंदाज जाहीर | पुढारी

जुलैत मुसळधार; राज्यात १०६% कोसळणार;देशात ९४ ते १०६ टक्‍के: हवामान विभागाचा जुलैचा अंदाज जाहीर

पुणे, पुढारी वृत्तसेवा : मान्सूनचे पारंपरिक वेळापत्रक सुरू होऊनही जूनमध्ये संपूर्ण महाराष्ट्राची चिंता वाढवणारे मोसमी वारे जुलैमध्ये मात्र मनसोक्त कोसळणार आहेत. जुलै महिन्यात महाराष्ट्रात सर्वत्र 100 ते 106 टक्के म्हणजे सामान्यपेक्षा जास्त पाऊस होणार आहे. हा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी वर्तवला आहे. देशात सरासरी 280.4 मि.मी. इतका (94 ते 106 टक्के) पाऊस राहील. ला निना सक्रिय असला तरी भारतीय समुद्री स्थिरांक सकारात्मक असल्याने पाऊस चांगला पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता दिल्ली येथील मुख्यालयातून डॉ. महापात्रा यांनी पत्रकारांशी ऑनलाईन संवाद साधत ही माहिती दिली. महाराष्ट्रात जुलैमध्ये पाऊस कसा राहील या प्रश्नावर डॉ. महापात्रा म्हणाले, महाराष्ट्रात पाऊस सामान्यपेक्षा जास्त म्हणजे 100 ते 106 टक्के राहील. कारण 4 जुलैपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून तो मान्सून अधिक तीव्र करणार आहे.

मध्य भारतात चांगला पाऊस…

महापात्रा यांनी सांगितले की, जुलै महिन्यात मध्य भारतात चांगला पाऊस राहील. तो सामान्यपेक्षा जास्त राहून 100 ते 106 टक्के कोसळेल. पूर्वोत्तर भारतातही समान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल. मात्र उत्तर भारतात प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहारमध्ये सामान्यपेक्षा कमी राहील. शिवाय आसाम, मेघालय आणि कर्नाटकात सामान्यपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.

अल निनोचा प्रभाव नाही

डॉ. महापात्रा म्हणाले, अल निनो सक्रिय झाला आहे. मात्र त्याचा प्रभाव भारतीय मान्सूनवर पडणार नाही. कारण भारतीय समुद्री स्थिरांक सध्या तटस्थ आहे. तो लवकरच सकारात्मक होत आहे. त्यामुळे जुलैमध्ये देशात 280 मि.मी. पाऊस पडेल.

पुणे ः जुलैमध्ये राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून नकाशात जेथे गडद निळा रंग दाखवला आहे, त्या भागात सामान्यपेक्षा जास्त; जेथे हिरवा रंग आहे तेथे सामान्य, तर पिवळा रंग आहे तेथे कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे.

4 जुलैपासून जोर

बंगालच्या उपसागरात 4 जुलैपासून कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे मान्सून अधिक तीव्र होईल, असा अंदाज आहे. सध्या कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर आहे. मात्र मराठवाडा, विदर्भात 1 ते 4 जुलैपर्यंत कमी राहील. त्यानंतर राज्यात चांगला पाऊस पडेल.

बिपरजॉयमुळे मान्सूनला उशीर

अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ 14 दिवस होते. त्यामुळे अरबी समुद्रातील मान्सूनची शाखा अडखळली. 25 जूनपर्यंत फारसा पाऊस पडला नाही. त्यानंतर मात्र बंगालच्या उपसागरातील शाखेने तो सक्रिय केला. जूनमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस देशात झाला.

Back to top button