परभणी : आषाढीनिमित्ताने पूर्णा येथे टाळ मृदंगाच्या गजरात भव्य रिंगण सोहळा | पुढारी

परभणी : आषाढीनिमित्ताने पूर्णा येथे टाळ मृदंगाच्या गजरात भव्य रिंगण सोहळा

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : टाळ मृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात पूर्णा येथे गुरुवारी (ता. २९) रोजी आषाढी महोत्सवानिमित्त आयोजित भव्य पालखी सोहळा रंगला. दिंडीत जुना मोंढा मैदानावर भव्य रिंगण सोहळा पार पडला.

स्वातंत्र्यसैनिक दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित आषाढी महोत्सवानिमित्त भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी नऊ वाजता नवा मोंढा मैदानावरून विठुरायाची मूर्ती असलेली पालखी टाळ मृदंगाच्या गजरात शेकडो भाविक, वारकरी शिक्षण संस्थेचे बाळगोपाल टाळकरी, अश्व, दिंड्या लेझीम पथक, मैदानी खेळाचे पथक यांच्यासह विविध सुंदर देखावे सहभागी झाले होते.

विजयकुमार कदम व भास्कर भाले यांच्या हस्ते प्रारंभी मूर्तीची पूजा करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल कदम यांनी आरती केली. शहरातील मुख्य मार्गावर जागोजागी पालखीची पूजा करून आरती करण्यात आली. रांगोळ्या रेखाटल्या होत्या. भगव्या पताकांनी शहर सजले होते. विविध वारकरी शिक्षण संस्थेतील चिमुकले वारकरी हे सुंदर भजन गात होते. सुहागन येथील छत्रपती संभाजी महाराज विद्यालयाचे लेझीम पथक लक्षवेधी होते.

विद्या प्रसारिणी शाळेचे सज्जन जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी- विद्यार्थिनींनी उत्कृष्ट मैदानी प्रात्यक्षिके सादर केली. बसस्थानक रोडवरून मिरवणूक छत्रपती संभाजी महाराज चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, महात्मा बसवेश्वर चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – महादेव मंदिर – श्री गुरु बुद्धी स्वामी मठ – जुना मोंढा मैदानावर पोहोचली. यावेळी भव्य रिंगण सोहळा पार पडला.

मान्यवरांनी टाळ मृदंगाच्या गजरावर ठेका धरत फुगड्या खेळत -खेळत आपला आनंद व्यक्त केला. सुत्रसंचालन गोपाळ भुसारे यांनी तर अमृतराज कदम यांनी आभार मानले. सोहळा यशस्वी करण्यासाठी विशाल कदम यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य, सेवाभावी संस्था, भाविक यांनी परिश्रम घेतले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button