Ashadhi Wari 2023: आषाढी एकादशीनिमित्त विठु-माऊलीच्या भक्तीरसात न्हाऊन निघाली राजधानी दिल्ली

Ashadhi Wari 2023:
Ashadhi Wari 2023:

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: आषाढी एकादशीनिमित्त राजधानीत आयोजित सांकेतिक वारीत शेकडो दिल्लीकर मराठी बांधत न्हाऊन निघाले. दिल्लीतील रस्ते विठुरायाच्या नामस्मरणात भक्तीरसात दंग होवून, भर पावसात 'भेटीलागीं जीवा लागलीसे आस'चे पुन्हा एकदा साक्षीदार ठरले. पारंपारिक वेशभूषा, फुगड्या घालत विठ्ठलाच्या भक्तीभावात तल्लीन होऊन ही वारी आर.के.पुरम सेक्टर-६ येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या दिशेने निघाली. पहाटे साडेपाच वाजता बाबा खडकसिंह मार्गावरील हनुमान मंदिर येथून ही वारी सुरू झाली.

भगवे झेंडे हाती घेवून, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, कपाळी टिळा लावलेल्या असंख्य भाविकांमुळे वातावरण भक्तीमय झाले होते. 'जय जय रामकृष्ण हरी' नामाचा गजर करीत भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी खास या वारीत हजेरी लावली. भाजप खासदार मनोज तिवारी यांनी या वारीचे स्वागत करीत भक्तांसोबत विठ्ठलाचे नामस्मरण करीत शुभेच्छा दिल्या. वारीनिमित्त पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

भक्तीच्या महारसात, १५ किलोमीटरची वारी करीत वैष्णवांचा हा मेळा दिल्लीकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले. स्वच्छतेची विशेष काळजी घेत, रस्त्यावर कचरा होणार नाही, याची दक्षता मराठी बांधवांनी घेतली होती, हे विशेष. राम मनोहर लोहिया सर्कल येथे भाजप नेते सुनील देवधर यांनी वारीचे स्वागत केले. हनुमान मंदिर, कॅनॉट प्लेस, बाबा खडकसिंह मार्ग गोल डाकखाना, डॉ. राम मनोहर लोहिया हॉस्पिटल, तीन मूर्ती चौराहा,११ मूर्ती तिठ्ठा, सरदार पटेल मार्ग, कौटिल्य मार्ग, शांतीपथ, मोतीबाग फ्लायओव्हर, राव तुलाराम मार्ग, मेजर सोमनाथ पथ, सागर सिनेमा, तमिल संगम, विठ्ठल मंदिर,रामकृष्ण पुरम असे मार्गक्रमण करीत वारीची सांगता झाली.

महाराष्ट्र संस्कृतीच्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या वारी परंपरेत मागील ५ वर्षांपासून दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे सदस्य सहभागी होतात. साधारण ८ ते ९ दिवसात आळंदी ते पंढरपूरपर्यंतची मार्गक्रमण पूर्ण करून विठ्ठलाचा आशीर्वाद समस्त दिल्लीकर बांधवांसाठी घेऊन येतात.याही वर्षी हे वारकरी विठ्ठल दर्शन घेऊन दिल्लीतील या सांकेतिक वारीत सर्वांसमवेत सहभागी झाले होते, अशी माहिती दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे वैभव डांगे यांनी दिली.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news