पाठिंबा हाेता; मग पहाटे चाेरुन शपथ का घेतली? शरद पवारांचा फडणवीसांना सवाल | पुढारी

पाठिंबा हाेता; मग पहाटे चाेरुन शपथ का घेतली? शरद पवारांचा फडणवीसांना सवाल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राज्‍यातील शिंदे-भाजप सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. आज राज्‍यात कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न मोठा आहे. सर्वात चिंतेचा भाग म्‍हणजे राज्‍यात महिला आणि मुलींवर हल्‍ल्‍यांचे प्रकार वाढत आहेत. राज्‍यातील १४ जिल्‍ह्यांमधून एकूण ४ हजार ४३१ मुली बेपत्ता झाल्‍या असून ही अत्‍यंत गंभीर आहे, असा दावा करत राज्‍यातील गृहमंत्र्यांनी इतर गोष्‍टींवर बोलण्‍यापेक्षा बेपत्ता मुलींच्‍या कुटुंबीयांच्‍या दिलासा देण्‍याचा प्रयत्‍न करावा. फडणवीस म्‍हणतात माझ्‍या साेबत चर्चा करुन शपथ घेण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला हाेता. माझा पाठिंबा हाेता असे म्‍हणता; मग पहाटे चाेरुन शपथ का घेतली? असा सवाल शरद पवारांनी फडणवीस यांना केला. आज पत्रकार परिषदेत त्‍यांनी भाजप नेतृत्त्‍वासह राज्‍य सरकारवर जाेरदार टीका केली.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय एका रात्रीत झाला नव्हता. खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठकीत चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतरच पहाटेचा शपथविधी झाला, असा गौप्यस्फोट विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर बोलताना शरद पवारांनी राज्‍यातील कायदा आणि सुव्‍यवस्‍थेच्‍या प्रश्‍नावर भाष्‍य करत फडणवीसांना टोला लगावला.

यावेळी पवार म्‍हणाले, ‘सर्वात चिंतेचा भाग म्‍हणजे राज्‍यात महिला आणि मुलींवर हल्‍ल्‍यांचे प्रकार वाढत आहेत. ठाणे, मुंबई, पुणे सोलापूर आणि पुणे येथून २४५८ मुली बेपत्ता झाल्‍या आहेत. राज्‍यात महिला आणि मुली बेपत्ता होण्‍याचे प्रमाण वाढ आहे. राज्‍यातील १४ जिल्‍ह्यांमधून एकूण ४हजार ४३१ मुली बेपत्ता झाल्‍या असून ही अत्‍यंत गंभीर आहे. राज्‍यातील गृहमंत्र्यांनी इतर गोष्‍टींवर बोलण्‍यापेक्षा बेपत्ता मुलींच्‍या कुटुंबीयांच्‍या दिलासा देण्‍याचा प्रयत्‍न करावा.” राज्‍यात महिलांच्‍या सुरक्षेबरोबरच जात आणि धर्मांच्‍या नावाखाली दंगली घडवल्‍या जात आहेत. जेथे भाजपची सत्ता तेथे दंगली होतात, असा आरोप त्‍यांनी केला.

… मग पहाटे चाेरुन शपथ का घेतली ?

फडणवीस म्‍हणतात, माझ्‍यासाेबत चर्चा करुन शपथ घेण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला हाेता. सरकार स्‍थापन करण्‍याबाबत आमची चर्चा झाली होती.  माझा पाठिंबा होता तर चोरुन पहाटे शपथ घेण्‍याची वेळ त्‍यांच्‍यावर का आली आणि सत्ता तीन दिवसांमध्‍ये कशी गेली? असा सवाल करत सत्तेसाठी फडणवीस काहीही करु शकतात, असा आरोपही शरद पवार यांनी केला.

विकेट गेलेला माणूस माझी विकेट गेली असे सांगतो का?

माझे सासरे क्रिकेटपटू होते. ते फिरकीपटू होते. मीही जागतिक क्रिकेट संघाचा अध्‍यक्ष म्‍हणून काम केले आहे. कोठे गुगली टाकायची हे मला चांगल कळतं. विकेट गेलेला माणूस माझी विकेट गेली असे सांगतो का, असा टोलाही त्‍यांनी फडणवीस यांना लगावला.

माझी मुलगी स्‍वत:च्‍या कर्तृत्‍वाने तीनवेळा खासदार झाली

माझ्‍या पक्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोटाळ्याचा आरोप केला. हा आरोप चुकीचा आहे. मी कोणत्‍याही बँकंचा सभासद नाही. शिखर बँकेशी माझा संबंध नाही. माझी मुलगी स्‍वत:च्‍या कर्तृत्‍वाने तीनवेळा खासदार झाली आहे, असेही त्‍यांनी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्‍या घराणेशाहीच्‍या आरोपवर बोलताना सांगितले.

मी विरोधकांना एकत्र केल्‍याने भाजपकडून माझ्‍यावर टीका

विरोधकांच्‍या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अस्‍वस्‍थता वाढली आहे, असा टोला लगावत मी विरोधकांना एकत्र केल्‍याने भाजपकडून माझ्‍यावर व्‍यक्‍तिगत टीका केली जात आहे, आरोप शरद पवारांनी केला. विरोधकांची पुढील बैठक आता बंगळूर येथे १३ आणि १४ जुलै राेजी होईल,  असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

मूळ प्रश्‍नांना बगल देण्‍यासाठी समान नागरी कायद्याचा मुद्दा

समान नागरी कायदा याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं मत मांडलं आहे. माझ्‍या पक्षाची भूमिका अशी आहे की, केंद्र सरकारने हा विषय विधी आयोगाकडे सोपवला आहे. त्‍यांनी लोकांकडून अहवाल मागवला आहे. समान नागरी कायदा प्रश्‍नी शीख आणि जैन समाजाची भूमिका स्‍पष्‍ट करावी. सर्वसामान्‍याचे लक्ष मूळ प्रश्‍नांपासून बगल देण्‍यासाठीच पंतप्रधानांनी समान नागरी कायद्‍याचा मुद्‍दा उपस्‍थित केला आहे, असा आरोपही त्‍यांनी केला.

 

Back to top button