बीड : वीज बिल थकबाकीदारांविरोधात महावितरणची मोहीम | पुढारी

बीड : वीज बिल थकबाकीदारांविरोधात महावितरणची मोहीम

गेवराई (बीड); पुढारी वृत्तसेवा : ज्या ग्राहकांनी आतापर्यंत वीज बिल भरले नाही किंवा वारंवार सूचना करूनही त्यास प्रतिसाद दिला नाही अशा वीज ग्राहकांवर महावितरणने ऐन सणासुदीच्या काळात कारवाई करण्याचा बडगा उभारला आहे. त्यामुळे थकबाकी भरली नाही तर ग्राहकांची दिवाळी अंधारात जाणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शहरातील महावितरणने आता थकबाकी वसूल मोहीम मोठ्या प्रमाणात राबविणे सुरू केले आहे. थकबाकीची कारवाई टाळण्यासाठी चालू आणि मागील बिलाचा भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले. असले तरी ऐन सणासुदीच्या काळात वीज तोडू नये अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ऐन सणाच्या काळात अंधार

गेवराई शहरातील गजबजले ठिकाण ताकडगावरोड येथे आहे. सोमवारी (दिनांक २५ ऑक्टोबर) रोजी संध्याकाळच्या सुमारास ताकडगाव रोडजवळ अचानक वीज तोडणीचा मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या दरम्यान येथील वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने रहदारी करण्याला व नागरिकांना लाईट गेल्यामुळे त्रासाला सामोरे जावे लागले.

ग्राहकांना दिवाळीच्या सणाच्या तोडांवर महावितरण सक्तीची वसुली करण्याचा सपाटा चालू केला आहे. गावांमध्ये काही लोकांनी बेधडकपणे आकडे टाकले असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता नियमित ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करीत आहेत. आकडे टाकले टाकणाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याने महावितरण विभागाचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच वीज बिल थकीत असलेल्या ग्राहकांस बिलाचे पैसे मागत असल्याचे अनेक तक्रारी आहेत.

आधिकाऱ्यांची पत्रकारांसमोर बोलण्यास टाळाटाळ

महावितरणचे कार्यकारी अभियंता निकम साहेब स्वतः रात्री आठ वाजता गेवराई येथील ताकडगाव रोड भागामधील वीज कनेक्शन कट करण्यासाठी काही कर्मचाऱ्यांसोबत गेले होते. यावेळी रात्रीच्या वेळी वसुली का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली.

सणासुदीच्या दिवसात वसुली नकोच

एकीकडे महावितरणची थकबाकी गोळा व्हायलाच पाहिजे. पण त्यासाठी किमान नागरिकांना पूर्वसूचना द्यायला हवी. दुसरी गोष्ट अशी की, लाईट तुम्ही कट करत आहात ती कारवाई दिवसा करायला हवी. रात्रीच्या सुमारास लाईट कट केल्यास गुन्हेगारी वाढू शकते. तर ऐन सणासुदीच्या दिवसात वसुली नकोच, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे बबलू खराडे, शिनू भाऊ बेदरे, एजाज शेख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार, जयसिंग माने, अमित वैद्य यांनी पुढारीशी बोलताना दिली.

हेही वाचलंत का? 

Back to top button