परभणी : जिंतूरमधील मौजे माणकेश्वर येथे गाळ काढताना सापडले हेमाडपंती मंदिर | पुढारी

परभणी : जिंतूरमधील मौजे माणकेश्वर येथे गाळ काढताना सापडले हेमाडपंती मंदिर

परभणी, पुढारी वृत्तसेवा : जिंतूर तालुक्यातील मौजे माणकेश्वर येथे तळ्याचा गाळ काढताना वनविभागास हेमाडपंती मंदिराचे पुरातन अवशेष सापडले असून, हे अवशेष मंदिराचा भाग असण्याची दाट शक्यता आहे. हे अवशेष पुरातत्त्वीय वारसा असल्याने पुरातत्त्व विभागाने लगेचच हस्तक्षेप करीत जेसीबीने करण्यात येणारे खोदकाम थांबविण्याचे आदेश जिंतूरच्या तहसीलदारांना दिले आहेत.

सध्या जिल्ह्याच्या विविध भागांत तलावातील गाळ काढण्याची मोहीम महसूल व वनविभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. गाळमुक्त तलाब व गाळयुक्त शिवार या मोहिमेतंर्गत है काम करण्यात येत आहे. याच अनुषंगाने मौजे माणकेश्वर येथे तळ्याचा गाळ काढण्याचे काम वनविभागातर्फे सुरू होते. त्याच वेळी खोदकामात हेमाडपंती मंदिराचे पुरातन अवशेष आढळून आले. त्यांनी याबाबतची माहिती प्रशासनाला दिल्यानंतर पुरातत्त्व विभागाने त्याची दखल घेतली. मंदिराच्या अवशेषांमध्ये कीर्तिमुखयुक्त कर्णशिळा, स्तंभाचे अवशेष, कक्षासनाचे अवशेष, मंडोवरावरील मूर्ती आदी अवशेष सापडले आहेत यावरून या ठिकाणी मंदिर असावे, असा निष्कर्ष निघत आहे. त्या मंदिराचे इतर अवशेषही मिळण्याची शक्यता असून, हे अवशेष पुरातत्त्वीय वारसा असल्याने या ठिकाणाच्या पुरातत्त्वीय संकेतानुसार उत्खनन योग्यरीत्या करणे गरजेचे आहे. सद्य:स्थितीत तळ्याचे करण्यात येणारे खोदकाम हे जेसीबीच्या साहाय्याने करण्यात येत असल्याने या अवशेषांना हानी पोचण्याची शक्यता नाकारता येत नाही व त्याद्वारे ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याचा धोका आहे, असेही सहाय्यक संचालक अमोल गोटे यांनी म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर या ठिकाणी जेसीबीद्वारे कोणत्याही प्रकारचे खोदकाम करण्यात येऊ नये. या ठिकाणी पुरातत्त्व विभागाची टीम २३ जून रोजी प्रत्यक्ष भेट देऊन हे अवशेष शास्त्रीय पद्धतीने काढण्यासंदर्भात आवश्यक ती कारवाई करणार आहे. त्यामुळे तहसीलदारांनी संबंधित विभागास खोदकाम करण्यास पूर्णपणे प्रतिबंध करावा, असेही स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button