बीड : ऊसतोड मुकादमाचे अपहरण; कोल्हापुरातील साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल | पुढारी

बीड : ऊसतोड मुकादमाचे अपहरण; कोल्हापुरातील साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

केज; गौतम बचुटे : ऊस तोडणीसाठी मजूर पुरविण्याचा करार करूनही मजूर पुरवठा केला नसल्याने केज तालुक्यातील एका ऊस तोड मजुराचे अपहरण करण्यात आले. याप्रकरणी माणिक रघुनाथ लांब नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना, कसबा बावडा या साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी अजित गाडे व कर्मचारी विकास जरग, तानाजी चौगुले यांच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज तालुक्यातील बनकरंजा येथील रवी माणिक लांब नागरगोजे याने कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना कसबा बावडा (ता. करवीर) यांच्याकडून ऊस तोडणी मजूर पुरवण्याचा करार करून १७ लाख ५० रु. उचल घेतली होती. परंतु सन २०२०-२१ मध्ये कोरोना व लॉकडाऊनमुळे त्याने मजूर पुरवठा केला नव्हता. त्यामुळे सदर कारखान्याचे अधिकाऱ्यांनी त्याला ऊसतोड मजूर पुरवा किंवा घेतलेले पैसे परत द्या, असा तगादा लावला होता.

दरम्यान २ जून रोजी बनकरंजा येथे काही अज्ञात लोकांनी रवि याच्याबाबत गावात चौकशी केली होती. त्यानंतर तो अंबाजोगाईकडे जात असताना त्याला बनकरंजा पाटीजवळ अनोळखी व्यक्तींनी अडवून त्याचे अपहरण केले आहे, असे रवि याने त्याच्या वडिलांना फोन वरून कळविले. त्यानंतर पुन्हा रवीच्या वडीलांना फोनवरून पैसे जमा करा, असे सांगितले. दरम्यान, अद्याप तो परत आला नसल्याने त्याचे वडील माणिक रघुनाथ लांब नागरगोजे यांच्या फिर्यादी वरून युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामदास काळे करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button