परभणी: थॅलेसेमियावर मात करत बारावीच्या परीक्षेत दोघांची बाजी | पुढारी

परभणी: थॅलेसेमियावर मात करत बारावीच्या परीक्षेत दोघांची बाजी

परभणी, पुढारी वृत्तसेवा : थॅलेसेमियासारख्या दुर्धर आजाराशी लढा देत बारावीच्या परिक्षेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनीने चांगल्या गुणांनी यश मिळविले. त्यांचे उत्तुंग यश पाहून ‘अभी तो नापी है, मुठ्ठीभर जमीं, अभी तो सारा आस्मा बाकी है’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांचे हे यश छोट्याछोट्या संकटाला घाबरत आयुष्याचा कंटाळवाणा प्रवास करणार्‍यांसाठी पथदर्शी आहे. थॅलेसेमियाग्रस्त अवधुत आचमे व सरिता ढास या विद्यार्थ्यांनी बारावी परिक्षेत मोठे यश संपादन केले.

दोघेही थॅलेसेमियाग्रस्त असल्याने दर १५ दिवसांला रक्त बदलावे लागते. अशातच बारावी परीक्षेचा अभ्यासही सुरूच होता. दर १५ दिवसांला रक्त संक्रमणासारख्या प्रक्रियेला सामोरे जावे लागत असतानाही त्यांनी बारावीचा अभ्यास मोठ्या नेटाने व जिद्दीने केला.
सरिता ढास हिने औरंगाबाद विभागात ७४ टक्के गुण मिळविले. तर कोद्री (ता.गंगाखेड) सारख्या अति दुर्गम भागात राहणार्‍या अवधुत आचमे याने ६३.८३ टक्के गुण मिळविले. या दोघांनी मिळविलेले यश सर्व थॅलेसेमियाग्रस्त पाल्यांच्या पालकांची हिंम्मत वाढविणारे व दिशादर्शक आहे.

या दोघांशिवाय जिल्ह्यातील चार थॅलेसेमियाग्रस्त विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाली आहेत. सचिन कमाले या विद्यार्थ्याने टॅक्सेशन लॉ करून सध्या आरोग्यविभागात नोकरी करीत आहे. तर नेहा गायकवाड ही बीएसस्सी नर्सिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवी पहाट उगवते आहे, असेच म्हणावे लागेल. थॅलेसेमियाग्रस्त मुलांवर नियमित उपचार केल्यास ते स्वतःच्या पायावर उभे राहून आपले जीवन व्यथीत करू शकतात. या विद्यार्थ्यांच्या यशावरून हे अधोरेखित झाले आहे.

हेही वाचा 

Back to top button