परभणी : मनपा कर्मचार्‍याचा मातीच्या ढिगार्‍याखाली सापडून मृत्यू | पुढारी

परभणी : मनपा कर्मचार्‍याचा मातीच्या ढिगार्‍याखाली सापडून मृत्यू

परभणी, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या कर्मचाऱ्याचा पाईपलाईनचे काम करताना मातीच्या ढिगाऱ्याखाली गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २) सकाळी घडली.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी प्रकाश नानासाहेब जाधव (वय ५७) हे शुक्रवारी सकाळी २० फूट खोल खड्ड्यात पाईपलाईन दुरूस्तीचे काम करत होते. दरम्यान त्यांच्या अंगावर मातीचा ढिगारा पडला. या ढिगाऱ्याखाली सापडल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. इतर कर्मचार्‍यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर जाधव यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

जाधव हे महापालिकेत गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ कार्यरत होते. ते पुढील वर्षी सेवानिवृत्त होत होणार होते. मात्र यापूर्वीच सेवेत असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मनपाने ५ लाखाची मदत द्यावी

गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेले प्रकाश जाधव हे मनपात ऑनड्युटी काम करीत होते. यावेळी त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे महापालिकेने याची दखल घेवून अपघाती निधन म्हणून त्यांच्या कुटूंबियांना 5 लाख रूपयांची मदत द्यावी, अशी मागणी मनपाचे माजी सभापती सचिन देशमुख यांनी केली आहे.

Back to top button