परभणी : कारची स्कुटीला धडक; १० वर्षीय बालकाचा मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी

जिंतूर; पुढारी वृत्तसेवा : जिंतूर-औंढा महामार्गावर एका कार व स्कुटीची समोरासमोर जोरदार धडक झाली यामध्ये तिघे जण जखमी तर एका १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.३१) बुधवारी रोजी सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास जिंतूर औंढा महामार्गावरील सांगळेवाडी पाटीजवळ घडली. यामध्ये तिघे जण जखमी झाले असून एका १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी येथून दर्शन घेऊन जिंतूरकडे जाणाऱ्या स्कुटीला महामार्गावरील सांगळेवाडी पाटीजवळ, समोरून येणाऱ्या भरधाव कारने जोराची धडक दिली.
यामध्ये स्कुटीवरील वचिष्ट लक्ष्मण मोहिते (वय ३० वर्ष रा.लहुजी नगर जिंतूर) सत्यभामा लक्ष्मण मोहिते (वय 45 वर्ष रा. लहुजी नगर जिंतूर), शामल रामभाऊ थोरात (वय १७ रा. राणीवाहेगाव ता परतूर), राजकुमार वचिष्ट मोहिते (वय १० वर्ष) हे चौघे जखमी झाले. सर्व जखमींना सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात, रुग्णवाहिका चालक विजय राठोड यांनी जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र यावेळी डॉ. देविदास गरड, आरोग्य कर्मचारी घाडगिने, यांनी तपासून राजकुमार वचिष्ट मोहिते वय 10 वर्ष याला मृत घोषित केले. तर इतर तिघांवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण मुरकुटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धीकी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दरम्यान धडक दिलेल्या कारच्या चालकाने घटनास्थळावरून वाहन घेऊन पळ काढला.