वाशिम : पुढारी वृत्तसेवा मानोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि. २६ मे रोजी भरदिवसा अज्ञात युवकांनी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दोन युवकांवर चाकूने सिनेस्टाईल हल्ला केला. यामध्ये शिवदास उघडे यांचा मृत्यू झाला होता, तर राहूल चव्हाण हे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणातील आरोपींविरुद्ध पोलीसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असुन, दुसऱ्या दिवसापर्यंत दोन आरोपींना अटक करून इतर फरार आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, शिवाजी महाराज चौकात दि.२६ मे रोजी दुपारी ११.३० वाजण्याच्या सुमारास शिवदास उघडे, राहूल चव्हाण यांच्यावर प्रेम प्रकरणच्या वादातून संशयीत आरोपी श्रीकांत उर्फ बबड्या कुंडलिक धवणे (वय २१ ) मु. मांगकिन्ही ता. दारव्हा, आकाश गोविंदा अगलगरे (वय २२) मू. गोरेगाव हल्ली मु. कारंजा लाड यांच्यासह इतरांनी चाकूने छाती, पोट व मांडीवर सपासप वार केले. या हल्ल्यात शिवदास उघडे हा ठार झाला, तर राहूल चव्हाण हे गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे डॉक्टरांनी हलविले आहे.
या घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव हे ताफ्यासह घटनास्थळी हजर झाले. मानोरा पोलिस स्टेशनला या घटनेची नोंद झाल्यावर दुसऱ्या दिवसापर्यंत पोलिसांनी वरील दोन संशयीत आरोपींना अटक केली असून, इतर संशयीत आरोपींचा शोध उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानोरा शहर पोलीस शोध घेत आहेत.
हेही वाचा :