अफगाणिस्तानात राहून केले आयआयटी; तिने घरीच उभारली प्रयोगशाळा | पुढारी

अफगाणिस्तानात राहून केले आयआयटी; तिने घरीच उभारली प्रयोगशाळा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  आय-आयटीला तिने भारतात प्रवेश घेतला. पण तिकडे देशात तालिबान सत्तेत आले आणि ती घरीच अडकून पडली. पण आयआयटीच्या मदतीने तिने घरीच अभ्यास केला. एवढेच नव्हे तर मैत्रिणी आणि नातेवाईकांकडून साहित्य मागवत तिने तळघरातच प्रयोगशाळा तयार केली. तिथेच एकदम कमजोर वायफायच्या मदतीने तिने भारतातून शिकवणी घेतली आणि ती चक्क आयआयटी झाली.

बेहिस्ता खैरुद्दीन नावाच्या 26 वर्षीय अफगाण मुलीची ही यशोगाथा आहे. तिने 2021 मध्ये आयआयटी मद्रासमध्ये केमिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. पण त्याचवर्षी अफगाणिस्तानात सत्तांतर झाले आणि तालिबान सत्तेत आले. मुलींच्या शिक्षणावर बंदी घालणार्‍या तालिबानची सत्ता असतानाही आयआयटी व्हायचेच, असा निर्धार केलेल्या बेहिस्ताने काबूलमध्ये आपल्या घरी राहूनच शिक्षण घेण्याचे ठरवले. तिला सगळे मार्गदर्शन ऑनलाईन करण्याची तयारी आयआयटीने दाखवली व तशी सुविधाही दिली.
घरातील अतिशय कमजोर अशा वायफायच्या जोरावर ती वर्ग करायची. इंजिनिअरिंगमध्ये आवश्यक असलेली प्रात्यक्षिकाची अडचण होती. त्यावरही मात करीत तिने प्रयोगशाळेसाठी आवश्यक असलेले साहित्य मैत्रिणी आणि नातेवाईकांकडून गोळा केले व चक्क तळघरातच प्रयोगशाळा तयार केली. अशा स्थितीत दोन वर्षे अभ्यास केल्यावर तिच्यासाठी खास ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. त्यात तिने घवघवीत यश मिळवत आयआयटी पूर्ण केले.

प्रत्यक्ष शिक्षण घेता आले नाही याची खंत नाही. मी कोणत्याही प्रकारे शिकलेच असते. मला तर तालिबानचे वाईट वाटते. सगळे काही असून ते त्याचा वापर करीत नाही याचे त्यांनाही वाईट वाटायला हवे.
– बेहिस्ता खैरुद्दीन

Back to top button