औसाच्या लेकीचे यूपीएससी परीक्षेत उत्तुंग यश; देशात ४७३ वा रँक | पुढारी

औसाच्या लेकीचे यूपीएससी परीक्षेत उत्तुंग यश; देशात ४७३ वा रँक

औसा : पुढारी वृत्तसेवा लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्याची कन्या अन् अहमदनगरची सून शुभाली परिहार-परदेशी यांनी नोकरी करून युपीएससी परीक्षेत देशात 473 वा रँक मिळवत यश प्राप्त केले. ग्रामीण भागातील मुलीही गुणवत्तेच्या जोरावर यश संपादन करू शकतात हे त्‍यांनी दाखवून दिले.

शुभाली लक्ष्मीकांत परिहार या मूळच्या औसा तालुक्यातील चलबुर्गा येथील असून, त्यांचे शालेय शिक्षण लातूर येथील श्री देशिकेंद्र विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालयात पूर्ण झाले. अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळविल्यापासून शुभाली यांनी स्पर्धा परीक्षांच्या तयारीला सुरुवात केली. एमपीएससी परीक्षेत यशस्वी होत त्‍यांना लातूर येथेच राज्य कर निरीक्षकपदी नियुक्ती मिळाली. तरीही आपणास युपीएससीचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. यासाठी त्या नोकरी करीत अभ्यास करीत होत्या. नोकरी करून दररोजचा आठ तासांचा अभ्यास हा ध्यास बाळगत त्‍यांनी यश मिळविले.

चलबुर्गा हे जाती-पातीच्या भिंती नसलेले गाव आहे. भूकंपानंतर तत्कालीन कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या संकल्पनेतून विविध जाती-जमातीची घरे पारंपरिकपणे वेगवेगळ्या ठिकाणी न बांधता विद्यापीठांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी एकात्मतेची पायाभरणी केली होती. त्याच संस्कारात शुभाली सेवाग्राममधील पहिल्या पदवीधर झाल्या. त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला.

यावेळी पुढारीशी बोलताना त्या म्हणाल्या, ग्रामीण भागात अथवा प्रतिकूल स्थितीतही मुली उत्तुंग यश मिळवू शकतात. त्यामुळे आई- वडिलांनी मुलांना अनुकूल वातावरण द्यावे. आजवर माझ्या पाठीशी असलेली आई संगीता, वडील लक्ष्मीकांत परिहार, सासू विद्या परदेशी, सासरे शंकरसिंग परदेशी (रा. चिखली, ता. श्रीगोंदा) आणि छत्तीसगडमध्ये आयएफएस असणारे पती चंद्रशेखर परदेशी यांचा या यशात मोलाचा वाटा आहे, असेही शुभाली म्हणाल्या.

आईची अधिकारी होण्याची इच्छा पूर्ण केली

मुलींनी शिकून अधिकारी व्हावे, अशी इच्छा असणाऱ्या आई संगीता परिहार यांचे कर्करोगाने पाच वर्षांपूर्वी निधन झाले. पण आईने समोर ठेवलेला शिक्षणाचा विचार अंमलात आणत शुभाली परिहार ह्या आज आपल्या गुणवत्तेच्या जोरावर यांनी गुणवत्तेचे शिखर गाठले.

हेही वाचा : 

Back to top button