उस्मानाबाद : तुळजाभवानी मंदिरातील प्रवेशासाठीचा ‘तो’ निर्णय मागे | पुढारी

उस्मानाबाद : तुळजाभवानी मंदिरातील प्रवेशासाठीचा ‘तो’ निर्णय मागे

तुळजापूर, पुढारी वत्तसेवा :  वादग्रस्त निर्णय घेतल्यानंतर राज्यभरातून टीकेची झोड उठली. त्यानंतर अवघ्या ५ तासांत यु टर्न घेण्याची नामुष्की तुळजाभवानी मंदिर संस्थान​वर आली. तोकडे, अशोभनीय कपडे घालून आल्यास भाविकांना दर्शन घेता येणार नाही. मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे फलक गुरुवारी (दि.१८) मंदिरात लावण्यात आले होते. जिल्हाधिकारी अध्यक्ष असणाऱ्या मंदिर संस्थानकडून अशा प्रकारची कृती अपेक्षित नसल्याची भावना ​भाविकांतून ​व्यक्त होत आहे.

गुरूवारी सकाळी तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी मंदिर परिसरात आणि महाद्वार परिसरात तसेच प्रशासकीय कार्यालयाच्या समोर आणि मुख्यमंत्रीच्या परिसरात बरमूडासारख्या छोटे कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश मिळणार नाही​,​ अशा आशयाचे सूचना फलक लावण्यात आले होते​. मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्या​चे आवाहन याद्वारे करण्यात आले होते. या संद​​र्भात तुळजापूरचे तहसीलदार आणि मंदिर संस्थांचे प्रभारी व्यवस्थापक सौदागर तांदळे यांनी स्थानिक पुजारी बांधवांकडून हा निर्णय घेतल्याबद्दल सत्कार देखील स्वीकारलेला होता​.

प्रसार माध्यमांना बोलताना मंदिराचे पावित्र्य राखण्याच्या अनुषंगाने हा यापूर्वीच्या तहसीलदार यांनी सदर निर्णय घेतलेला आहे​. त्याची अंमलबजावणी आजपासून करण्यात आल्याचे सांगितले होते​;​ मात्र सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर अशा प्रकारचा निर्णय तुळजाभवानी मंदिर संस्थान​ने घेतलेला नाही, असे सांगत परिसरातील सर्व महंत​,​ पुजारी​,​ सेवेकरी व भावि​क​ भक्तांना ​पूर्वीप्रमाणेच मुक्त प्रवेश असल्याचे सांगण्यात आले. तशा निर्णयाची प्रतच डकविण्यात आली. याविषयी फोन करून विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही अधिकाऱ्यां​शी संपर्क होऊ शकला नाही.

तुळजाभवानी मंदिर संस्थान सतत वादग्रस्त निर्णय घेत असल्यामुळे भाविक भक्तामध्ये संतापाची लाट उसळली आहे​. कोणत्या ना कोणत्या कारणाने भक्तांना त्रास होत असल्यामुळे भाविक भक्त सतत प्रशासनाच्या विरोधात आपली मते व्यक्त करत​ आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय नाही​. चप्पल ठेवण्यासाठी चांगली जागा उपलब्ध नाही​. बसण्यासाठी आरामदायी कुठलीही जागा मंदिर परिसरात नाही​. या सुविधा पुरविण्याचे सोडून मंडोर प्रशासन इतर प्रसिद्धीसाठी निर्णय घेते आहे​,​ अशा भावना व्यक्त होत आहेत​. जिल्हाधिकारी या मंदिर संस्था​न​चे अध्यक्ष असताना आणि तहसीलदार हे व्यवस्थापक असताना या मंदिरात भाविकांची सोय होत नाही ही सततची ओरड आहे. हा निर्णय लागू करणे आणि मागे घेणे यामुळे मंदिर संस्थानची प्रतिष्ठा जनमानसात काळवंडली आहे.

मग फलक लावले कोणी..?

दरम्यान, मंदिर संस्थानच्या म्हणण्यानुसार तोकड्या कपड्यातील भाविकांना मंदिरात प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतलाच नव्हता. तर तशा आशयाचे फलक मंदिर परिसरात लावले कोणी. ते फलक लावेपर्यंत मंदिर प्रशासनचे अधिकारी, कर्मचारी काय करीत होते. विशेष म्हणजे गुरुवारी दुपारीच मंदिरातील सुरक्षा रक्षकांनी बर्मुडा घालून पालकांसमवेत बाहेरगावाहून आलेल्या मुलांना नियमाकडे बोट दाखवून प्रवेश नाकारला. हे सर्व होत असताना प्रशासन डोळे झाकून बसले होते, काय असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

हेही वाचा 

Back to top button