उस्मानाबाद: मुळज येथे शिव पार्वती विवाह सोहळा उत्साहात | पुढारी

उस्मानाबाद: मुळज येथे शिव पार्वती विवाह सोहळा उत्साहात

उमरगा; पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील मुळज येथील ग्रामदैवत श्री जटाशंकर देवस्थानच्या यात्रेनिमित्त बुधवारी, (दि २९) सकाळी साडे अकराच्या सुमारास शिव पार्वती विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात सर्व जाती धर्मातील हजारो भाविकांची उपस्थिती होती.

सीमावर्ती भागांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुळज (ता. उमरगा) येथे प्राचीन उत्कृष्ट शिल्प कलेचा उत्तम नमुना असलेले जागृत श्री जटाशंकर हेमाडपंती मंदिर आहे. मंदिरात प्राचीन काळापासून सुरू असलेली देवस्थानची यात्रा गुढीपाडव्या पासून काठीची प्रतिष्ठापणा सोयराप्पा परिवारातील मानकरी यांच्या हस्ते होते. यात्रा काळात गावात विविध धार्मिक, भजन, भारूड, पोवाडे, समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. प्राचीन काळापासून सर्व धर्म समभाव व सामाजिक एकोप्याने तसेच राष्ट्रीय एकात्मता जोपासत हा सोहळा सुरू असतो. तसेच शिखर शिंगणापूरनंतर मोठ्या उत्साहात विवाह सोहळा साजरा करण्याची परंपरा ग्रामस्थ आजही भक्ती भावाने जोपासतात.

या सोहळ्यात मान पान आहेर स्वीकारला जात नाही. तसेच कसल्याही प्रकारचे निमंत्रण दिले जात नाही. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी चैत्र शुद्ध अष्टमीला विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सकाळपासून मंदिराकडे जाणारा रस्ता भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. काही काळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. सकाळी साडे अकराच्या सुमारास विधिवत धार्मिक पुजा, वेदमंत्रोच्चारात अकरा मंगलाष्टके म्हणून कन्यादानाचा मान असलेले अरूण व सविता पाठक दाम्पत्यानी पार्वतीचे कन्यादान केले. यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी अक्षता टाकल्या. शेवटची मंगलाष्टके संपताच बॅन्ड, ढोल, ताशाचा गजर व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

यावेळी जि. प. चे माजी सभापती अभय चालुक्य, जि.प.चे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील, युवानेते हर्षवर्धन चालुक्य, काठीचे मानकरी तानाजी बिराजदार, व्यंकट बिराजदार, पंढरी बिराजदार, तात्याराव बिराजदार, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बालवीर शिंदे, व्हाईस चेअरमन सतिश जाधव, सुनिल कुलकर्णी, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष सुधाकर चव्हाण, मारूती चव्हाण, रघुनाथ मुळजे, माजी सरपंच सुधाकर जाधव, डॉ. अजिंक्य पाटील, वेदमूर्ती आशोक जोशी, महेश इनामदार, गोपाळ जोशी, सदाशिव पाटील, देवीदास चव्हाण, कमलाकर चव्हाण आदींसह सीमावर्ती भागातील हजारो महिला व पुरुष वर्हाडी भाविक सहभागी झाले होते. सोहळा यशस्वीतेसाठी देवस्थान व्यवस्थापण समितीसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

पाठक दाम्पत्याकडून पार्वतीचे कन्यादान!

प्राचीन काळापासून चालत आलेल्या जटाशंकर मंदिरातील शिव पार्वती विवाह सोहोळ्यात यावर्षी अरूण व सविता पाठक या दाम्पत्यानी परंपरेनुसार विधीवत धार्मिक पूजा व पार्वतीचे कन्यादान केले. त्यानंतर मंगलाष्टके व उपस्थित हजारो भाविकांनी अक्षता टाकल्या.

हजारो भाविकांना महाप्रसाद वाटप!

विवाह सोहळ्यात सहभागी सर्व भाविकांना मकरंद कुलकर्णी, महादेव चव्हाण, दत्ता बिराजदार, आप्पाराव वडदरे, प्रभाकर साळुंखे, लक्ष्मण दुधभाते, अतुल चव्हाण, बब्रुवान चव्हाण आदीसह ग्रामस्थाच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला.

जटाशंकर देवस्थान यात्रा महोत्सवात विविध धार्मिक व भरगच्च सांस्कृतिक आणि सामाज प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार (दि ०५) रात्री आठ जटाशंकर संगीत महोत्सव यात नगर येथील प्रसिद्ध गायक भजन सम्राट बाळासाहेब वायकर यांचा संगीत कार्यक्रम, पहाटे छबीना, गुरूवारी, (दि ०६) मानाची काठी व श्री ची पालखी मिरवणूक, शुक्रवारी, (दि ०७) सकाळी श्री छत्रपती शिवशंभो फाऊंडेशनच्या वतीने मोफत महाआरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर, दुपारी जंगी कुस्त्या, रात्री भारूडे, पहाटे महाआरती व प्रसाद वाटपाने यात्रा महोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे.

हेही वाचा 

Back to top button