उस्मानाबाद : एक लाखाची लाच घेताना सरपंच पतीला अटक | पुढारी

उस्मानाबाद : एक लाखाची लाच घेताना सरपंच पतीला अटक

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर कामे सुरू करण्यासाठी एक लाख रूपयांची लाच स्विकारताना रोहकल (ता. परंडा) येथील सरपंच पतीला लाचलुचपत विभागाच्या उस्मानाबाद जिल्हा पथकाने आज (दि. २३) रंगेहात पकडले. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सरपंच पती हनुमंत पांडुरंग कोलते याला अटक केली आहे.

रोहकल गावात जल जीवन मिशन अंतर्गत सौर उर्जेवरील दुहेरी पंप लघुनळ योजनेचे काम तीन वस्त्यांवर सुरू आहे. सरपंच पती हनुमंत याने या योजनेचे काम थांबवून काम करायचे असेल तर प्रत्येकी ५० हजार रुपये प्रमाणे दीड लाख रुपये किंवा सोलरच्या तीन प्लेट व त्याचे साहित्य द्यावे, अशी मागणी तक्रारदाराकडे केली होती. यातील एक लाख रुपये घेताना त्याला जिल्हा परिषदेच्या उपाहारगृहात सापळा रचून रंगेहात पकडले. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा

Back to top button