गेवराई: अवकाळी पाऊस थांबल्याने खरिपाच्या पूर्व मशागतीला वेग | पुढारी

गेवराई: अवकाळी पाऊस थांबल्याने खरिपाच्या पूर्व मशागतीला वेग

गेवराई; पुढारी वृत्तसेवा: अवकाळी पाऊस थांबल्याने खरीप पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे. बैलजोडीपेक्षा ट्रॅक्टरला शेतकऱ्यांची अधिक पसंती असल्याचे चित्र गेवराई तालुक्यात दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून अवकाळीमुळे शेती मशागतीची कामे करता आली नव्हती. दरम्यान अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने, वातावरण देखील तापले आहे. त्यामुळे पेरणीपूर्व खरिपाच्या मशागतीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.

बैलजोडीचे दर अवाच्या सव्वा वाढल्याने मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत केली जात आहे. नांगरणीसाठी एकरी सहाशे ते आठशे रुपये खर्च येत आहे. सध्या शेतकरी खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीला गुंतला असून, कपाशी लागवडीकडे शेतकऱ्यांचा अधिक कल वाढला असल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी

गत एप्रिल महिन्यात तालुक्यात विजांचा कडकडाट, वादळी वारा आणि गारपिटीसह अवकाळी पाऊस पडला. यामुळे फळबागांसह गहू, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

हरभऱ्याचे चुकारे नाहीत, कापूस घरीच

गतवर्षी १२ हजारांवर भाव मिळाल्याने दरवाडीच्या प्रतीक्षेत बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली. सध्या आठ हजारांचे दरम्यान भाव असल्याने कापूस घरातच आहे. याशिवाय काही शेतकऱ्यांनी नाफेडला हरभरा विकला तर काही प्रतीक्षेत आहेत. त्यांना अद्याप पेमेंट मिळालेले नाही. बँकांनी कर्जवाटप सुरु केलेले नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगभग

शेतकऱ्यांकडून पेरणीसाठी बियाणांची जुळवाजुळव सुरु आहे. मे महिन्यामध्ये लग्नसराई जास्त प्रमाणात असल्यामुळे शेतीच्या कामासाठी मजुरांची कमतरता भासली जात आहे. तरी मजुरीचा दर अनेक शेतक-यांनी वाढविल्यामुळे मजूरही मिळत असल्याने शेतीची पूर्वतयारी करण्यास आता विलंब होत नसल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले.

अनेक शेतकरी बियाण्याची जुळवाजुळव करत असल्याचेही चित्र दिसते. त्याचप्रमाणे कृषी केंद्र चालक यांनीही खते बियाणे आपल्या दुकानात विक्रिसाठी ठेवल्याचे चित्र सध्यातरी ग्रामीण भागात दिसून येत आहे. त्यामुळे शेतीची पूर्व तयारी शेतकरी करत असल्याचे चित्र गेवराई तालुक्यात पाहिला मिळत आहे.

हेही वाचा:

Back to top button