पुणे : कालवा आवर्तनाने पिकांना नवसंजीवनी | पुढारी

पुणे : कालवा आवर्तनाने पिकांना नवसंजीवनी

सांगवी : पुढारी वृत्तसेवा : एकीकडे ऐन उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असतानाच दुसरीकडे बारामती तालुक्यातील सांगवी परिसरात कालव्याच्या आवर्तनाने शेतातील उभी पिके हिरवीगार डौलताना दिसत आहेत. शेतीसाठी आवर्तन आल्याने विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. सांगवी परिसरातील शेती निरा डावा कालव्याच्या वितरिका क्रमांक 18 वर अवलंबून आहे. या वितरिकेला नुकतेच शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले होते. सध्या शेतांमध्ये शेतकर्‍यांनी ऊस, बाजरी, कांदा तसेच जनावरांसाठीचा वेगवेगळा चारा व तरकारीची पिके घेतलेली आहेत. या पिकांना वेळेवर पाणी उपलब्ध झाल्याने सर्वच पिके हिरवीगार डौलताना दिसत आहेत.

जलसंपदा विभाग व वितरिकेवरील पाणी वापर संस्थांनी योग्यप्रकारे नियोजन केल्याने शेवटच्या शेतातील पिकांना पाणी पोहचण्यासाठी मदत झाली. कालव्याचे आवर्तन येऊन गेल्यानंतर सांगवी परिसरातील विहिरी काठोकाठ भरलेल्या पाहायला मिळत आहे. विंधनविहिरींच्या पाणीपातळीतही चांगली वाढ झालेली असल्याने उन्हाळ्याच्या अखेरपर्यंत शेतातील उभ्या पिकांना काहीसा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

सध्या भाटघर, निरा देवघर व वीर धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 टक्के कमी पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच पालखी सोहळ्यासाठी पाणी शिल्लक ठेवावे लागणार आहे. तर उन्हाळ्यातील तिसरे आवर्तन मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.
                     – प्रवीण घोरपडे, उपविभागीय अभियंता, पणदरे जलसंपदा विभाग

 

Back to top button