चांबळीतील शेतकरी घेतोय सोनचाफ्याचे उत्पादन | पुढारी

चांबळीतील शेतकरी घेतोय सोनचाफ्याचे उत्पादन

सासवड : पुढारी वृत्तसेवा : चांबळी (ता. पुरंदर) येथील शेतकरी मोहन कामठे व कुटुंबांनी चार वर्षांपूर्वी लावलेल्या सोनचाफ्याच्या फुलशेतीतून त्यांच्या जीवनात अर्थपूर्ण सुगंध दरवळत आहे. केवळ 20 गुंठ्यांत 350 झाडांतून वर्षाला 3 लाख नफा मिळत आहे.
मोहन कामठे हे एकदा त्यांच्या मामाच्या गावाला यवत (ता.दौंड) गेले असताना त्यांनी सोनचाफ्याची शेती पाहिली. त्यांनी तेव्हा सोनचाफ्याची सर्व माहिती घेतली. यानंतर रत्नागिरीहून रोपे आणून त्यांच्या चांबळी येथील शेतात 20 गुंठे क्षेत्रावर लागवड केली. कामठे यांनी 100 रुपयाला एक याप्रमाणे 350 रोपांची लागवड केली. यासाठी सुरुवातीला 30 हजार रुपये खर्च आला. पहिल्या वर्षी जेमतेम उत्पादन मिळाले. मात्र, नंतर त्यांना वर्षाला तीन लाखांचे वार्षिक उत्पन्न मिळाल्याचे कामठे म्हणाले.

सोनचाफ्याच्या दहा फुलांची एक पुडी बांधली जाते. तिला 5 ते 60 रुपयांपर्यंत भाव मिळतो. सणासुदीत चांगला भाव मिळतो. एरवी 5 ते 10 रुपयांचा भाव मिळतो. गुलटेकडी (पुणे) येथील फुल मार्केटमध्ये फुले विकतात. फुलांची काढणी पहाटेच करावी लागते. कळी असतानाच काढून ती बाजारात पाठवली जातात. एकदा लागवड केल्यावर किमान 10 ते 15 वर्षे
उत्पादन मिळते.

व्यावसायिक फुलशेतीत प्रगतीने पुढे जाण्याची क्षमता सोनचाफ्यात आहे. मात्र, सोनचाफ्यात दुर्लक्ष केले, तर तीच झाडे तोडावीही लागल्याचे पाहिले आहे. व्यवस्थापन, देखभाल, फूलतोडणी, पॅकिंग व मार्केटिंग याला रोज अधिक वेळ दयावा लागतो. वर्षातून एकदा छाटणी, उन्हाळ्यात आठ दिवसाला पाणी इतर वेळी पंधरा दिवसाला पाणी लागते. पावसाळ्यात पाण्याची गरज नसते.
                                                                            मोहन कामठे, फुलउत्पादक.

Back to top button