जालना: वडीगोद्री परिसरात गारपिटीमुळे फळबागांचे मोठे नुकसान | पुढारी

जालना: वडीगोद्री परिसरात गारपिटीमुळे फळबागांचे मोठे नुकसान

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात आज (दि.२५) दुपारी वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभऱ्यासह मोसंबी, आंबा आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळी हंगामातील टरबूज, खरबूज आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. गारपिटीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

वडीगोद्री परिसरात आज दुपारी तीनच्या सुमारास वादळी वारा व गारांसह तुफान गारपीट झाली. विजांचाही गडगडाट झाला. वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिसरातील अनेक ठिकाणी झाडे पडली. तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाली असून जनावरांना गारपिटीचा तडाखा सहन करावा लागला. आधीच खरिप हंगामात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही. आणि आता परत गारपिटीने रब्बी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.

अंबड तालुक्यातील वडीगोद्री, सुखापुरी व गोंदी महसूल मंडळात तुफान गारपीट झाली. करंजाळा, पिठोरी सिरसगाव, घुंगर्डे हदगाव, वडीगोद्री, धाकलगाव, भणंग जळगाव आदी भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे रब्बी हंगामातील गहू आणि हरबरा तर मोसंबी, आंबा बागांची फळगळ होऊन मोठे नुकसान झाले.

माझे धाकलगाव शिवारात दोन एकर क्षेत्र असून गारपीट व अवकाळी पावसामुळे माझ्या अंजिराच्या बागेचे अतोनात नुकसान झाले. याची शासनाने दखल घेऊन पंचनामा करावा. तसेच नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी

– शिवाजी दुरांडे. शेतकरी, धाकलगाव.

यावर्षी अस्मानी व सुलतानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. निसर्गाचा प्रकोप शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे. गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल होऊन आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे. त्यामुळे कृषी आणि महसूल विभागाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी.

– सुरेश काळे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना जालना

हेही वाचा 

Back to top button