जालना : बारसवाडा फाट्यावर महसूल पथकाची कारवाई; ४० ब्रास अवैध वाळू जप्त | पुढारी

जालना : बारसवाडा फाट्यावर महसूल पथकाची कारवाई; ४० ब्रास अवैध वाळू जप्त

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर-सोलापूर महामार्गालगत असलेल्या बारसवाडा फाटा येथे एका हॉटेलच्या मागे 40 ब्रास अवैध वाळू साठा अंबड तहसीलदार चंद्रकांत शेळके व महसूल पथकाने जप्त केला. हि कारवाई (गुरूवार) दि.20 एप्रिल रोजी रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली.

अंबड तालुक्यातील बारसवाडा येथे राजस्थानी चौधरी हॉटेलच्या मागे महामार्गापासून अंदाजे अर्धा किलोमीटर अंतरावर अवैध वाळू साठा असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली होती. या नंतर तहसीलदार व महसूल पथकाने 11 वाजण्याच्या दरम्यान बारसवाडा येथे जाऊन हॉटेलच्या मागे वाळूचा साठा केल्याचे त्‍यांना आढळले. यावेळी अंदाजे चाळीस ब्रास इतका वाळूचा साठा असल्याचे त्‍यांच्या निदर्शनास आले.

सदर वाळूसाठ्या विषयी शेजारील शेतकऱ्यांकडे चौकशी केली असता, हा साठा कोणी केला हे त्यांना माहीत नसल्‍याचे सांगण्यात आले. सदर साठा अज्ञात कोणी तरी केला असल्याने तो वाळूसाठा चोरीला जाऊ नये यासाठी जप्त करण्यात आला असून, त्याचा रीतसर पंचनामा करून सदरचा वाळूसाठा तहसील कार्यालयात हलवीण्यासाठी वाहनातून वाहतूक करून त्यानुसार सदरचा साठा तहसील कार्यालयात जमा करण्यात आलेला आहे.

हा साठा नियमानुसार सरकारी कामासाठी वरिष्ठांच्या परवानगीने देता येईल असे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले. हि कारवाई तहसीलदार चंद्रकांत शेळके, नायब तहसीलदार विश्वास धर्माधिकारी, महसूल सहाय्यक अनिल शिरसाठ, तलाठी विठ्ठल गाडेकर, विजय जोगदंड, राम महाले, संतोष जयस्वाल, रमेश कोनेरवार, स्वप्नील खरात, कोतवाल संदीप धारे, मनोज उघडे, सतीश राक्षे, मनिष जिरेकर, सुनील काळुंखे यांनी केली. गोदावरी परिसरात अवैध वाळू उपसा व वाहतुकी संदर्भात तहसीलदार व महसूल पथकाने कारवायांवर कारवाया सुरु केल्‍याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button