गौतम अदानी- शरद पवार भेटीवर अजित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले... | पुढारी

गौतम अदानी- शरद पवार भेटीवर अजित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

पुढारी ऑनलाईन: गुरुवार २० एप्रिल रोजी प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल दोन तास प्रदीर्घ चर्चा झाली. या दोघांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पवार- अदानी भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या भेटीवरून आरोप-प्रत्यारोपही झाले. आज शुक्रवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली.

खासदार शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीवर विरोधकांनी पवार यांच्यावर आरोप करत टीका केली. यावरून राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत हिंडेनबर्ग रिसर्च प्रकरणी अदानी यांची बाजू घेतली होती. यावेळीही पवार यांच्यावर आरोप आणि टीका झाली. आता गुरुवारी अदानी यांनी घेतलेल्या भेटीनंतरही पवार यांच्यावर पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.

या भेटीवर बोलताना अजित पवार म्हणाले, खासदार शरद पवार यांनी गौतम अदानी यांची भेट घेतली नाही. अदानी हे शरद पवार यांच्याकडे आले होते. भविष्यात कोणावर काही आरोप झाले, तर तो व्यक्ती कोणाचीही भेट घेऊ शकतो. ही भेट कशासाठी घेतली, हे अजुनही समोर आलेले नाही. शरद पवार आणि गौतम अदानी यांची जुनी ओळख आहे, हे सर्वांना माहित आहे. ओळखीच्या व्यक्तीला भेटणे यात काही चूक आहे, असं मला वाटत नाही असं अजित पवार म्हणाले.

राज्यपालांना पत्र

तसेच पुढे बोलताना पवार म्हणाले की, खारघरच्या घटनेसंदर्भात मी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. राज्य सरकारनं त्यात मृतांचा आकडा घोषित केला आहे. परंतु, निश्चित आकडा मिळत नाही. दबक्या आवाजात काही लोक त्या उष्माघातात लोकांना वेळेवर काही गोष्टी मिळाल्या नाहीत असं म्हणतात. मी या घटनेतील मृत लोकांच्या पोस्टमार्टमचा रिपोर्ट माहितीच्या अधिकारात मागवला आहे. पण काही लोक म्हणतात की, जी संख्या सांगितली जात आहे, त्यात तफावत आहे असंही अजित पवार यावेळी म्हणाले. जेव्हापासून महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास सुरुवात तेव्हापासून यावेळी सर्वाधिक खर्च केला गेला आहे. त्त्यांची सर्व टीम तिकडे राबत होती. राज्याचे मुख्यमंत्रीही तिकडे जात होते. असं असतानाही तिथे लोकांना पाणीही मिळालं नाही, अशी ऐकीव माहिती आहे. ही गंभीर बाब आहे, म्हणूनच मी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे, असंही अजित पवार यांनी सांगितलं.

Back to top button