बीड : मुकुंदराज घाटात बस पलटी होऊन ४६ प्रवासी जखमी | पुढारी

बीड : मुकुंदराज घाटात बस पलटी होऊन ४६ प्रवासी जखमी

अंबाजोगाई; पुढारी वृत्तसेवा : अंबाजोगाई बसस्थानकातून निघालेली मोरफळी बसचा मुकुंदराज दरी मार्गे जात असताना घाटामध्ये आज (दि.१८) दुपारी दीडच्या सुमारास ब्रेक फेल झाला. चालकाने प्रसंगावधान राखून ही बस रस्त्यालगत असलेल्या झाडावर धडकली. त्यामुळे बसमधील 53 प्रवाशांपैकी 46 प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती कळताच पोलीस, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, नायब तसीलदार गणेश सरोदे, पोलीस निरिक्षक विनोद घोळवे त्यांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेतली. जखमींना बसमधून बाहेर काढत रूग्णालयात दाखल केले. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील 53 प्रवासी बचावले. अन्यथा बस दरीत कोसळली असती तर मोठा अनर्थ घडला असता.

अंबाजोगाई आगाराची (एम.एच.20 बी.एल.0320) अंबाजोगाई-मोरफळी ही गाडी बसस्थानकातून आज दुपारी दीड वाडता 53 प्रवासी घेवून निघाली होती. ही बस मुकुंदराजच्या घाटामध्ये उतरत असताना बसचे ब्रेक फेल झाल्याने चालक कैलास कांबळे याने प्रसंगावधान राखून घाटातील पहिल्या मोठ्या वळणावरून रस्त्यालगत असलेल्या झाडावर बस घातली. त्यामुळे ही बस झाडाला अडकून दुसर्‍या वळणावर जावून पलटी झाली. सदरील झाड नसते, तर हे दोन्ही वळण ओलांडून ही गाडी मुकुंदराजजच्या दरीमध्ये कोसळली असती. परंतु चालकाच्या तत्परतेमुळे गाडीतील सर्व प्रवासी किरकोळ जखमी वगळता बचावले.

या अपघाताची माहिती शहरात पसरताच भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी शहरातील सर्व रूग्णवाहिका घटनास्थळावर पाठवून जखमींना रूग्णालयात दाखल केले. यानंतर नायब तहसीलदार गणेश सरोदे, अधिकारी गोविंद जाधव, पोलीस निरिक्षक विनोद घोळवे, ग्रामीण ठाण्याचे पोलीस, तहसील कर्मचारी घटनास्थळावर दाखल होत त्यांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरिक्षक विनोद उंबरगे यांनी घटनास्थळावर जावून पंचनामा केला. त्यांच्या अहवालामध्येच अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे.

हेही वाचा 

Back to top button