बीड : आष्टी तालुक्यात गारांचा खच; जोरदार वार्‍यासह पाऊस | पुढारी

बीड : आष्टी तालुक्यात गारांचा खच; जोरदार वार्‍यासह पाऊस

देवळाली, पुढारी वृत्तसेवा : आष्टी तालुक्यातील अरणविहीरा, तागडखेल, वेलतूरी, देवळाली, घाटा पिंपरी, गौखेलसह परिसरात शनिवारी (दि. १५) निसर्गाने रौद्र रुप धारण केले. जवळपास दिड तास जोराचा वारा, पाऊस आणि गारपिट सुरु असल्याने शेतीसह घरांचे नुकसान झाले आहे. जोराचा वारा व पाऊस सुरु असल्याने नुकसानीचा अंदाज अद्याप आलेला नाही.

हवामान विभागाने बीड जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर केलेला होता. काही दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्याच्या काही भागात गारपिट झाली होती. यानंतर आता आष्टी तालुक्यातील हारेवाडी,मराठवाडी, पिपळगाव घाट, अरणविहरा, शेडाळा, देऊळगाव, अरणविहीरा, तागडखेल, वेलतूरी, देवळाली, घाटा पिंपरी, गौखेल या भागात शनिवारी सायंकाळी अवकाळी पावसाने तडखा दिला. या भागातील शेतकर्‍यांची पिके पुर्णपणे वाया गेली असून घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या गारपीटात नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना तात्काळ पंचनामे करुन महसुल प्रशासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी जिल्हाधिकारी आणि तहसिलदार यांंच्याकडे आ.बाळासाहेब आजबे यांनी केली आहे.

गारांच्या ओझ्याने पत्रे आले खाली

जवळपास दिड तास गारपिट, पाऊस सुरु असल्याने घरांच्या पत्र्यावर गारांचा ओझे झाले. परिणामी पत्रे खाली येवून अनेक घरांचे नुकसान झाले आहे. तसेच गारपिटीमुळे आंब्याचे नुकसान झाले असून काही ठिकाणी तर झाडे निष्पर्ण झाली आहेत.

Back to top button