बीड: अंबाजोगाई बाजार समिती निवडणुकीसाठी १०६ उमेदवारी अर्ज दाखल | पुढारी

बीड: अंबाजोगाई बाजार समिती निवडणुकीसाठी १०६ उमेदवारी अर्ज दाखल

अंबाजोगाई; पुढारी वृत्तसेवा : अंबाजोगाई बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 18 जागेसाठी आज (दि. ३) शेवटच्या दिवशी 106 उमेदवारी अर्ज दाखल झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने भाजपा व महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. या निवडणुकीत खरी लढत महाविकास आघाडी व भाजपमध्ये होणार असली तरी शेतकरी संघटनाही या निवडणुकीत उतरल्याने तीन पॅनल होतात की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.

28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आज 3 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. या दिवशी एकूण 106 उमेदवारी अर्ज दाखल झाले. 18 संचालकाच्या पदासाठी सोसायटी गटातून 11 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. 11 जागांसाठी 63 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर ग्रामपंचायत गटातून 4 संचालक निवडून द्यायचे आहेत. या 4 जागांसाठी 27 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. व्यापारी गटातून 2 संचालक निवडून द्यायचे आहेत. या दोन जागांसाठी 9 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर हमाल मापाडी गटातून 1 उमेदवार निवडून द्यायचा असून या एका जागेसाठी 7 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. एल. पोतंगले यांनी दिली.

एकूण मतदार- 3834

बाजार समितीच्या निवडणूकीसाठी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत एकुण 3834 मतदार आहेत. यात सेवा संस्था गटात 759, ग्रामपंचायत गटात 916, व्यापारी गटात 1668, तर हमाल मापाडी गटात 491 मतदार आहेत.

हेही वाचा 

Back to top button