बीड ; शाळेत बॉम्‍ब ठेवल्‍याचा ‘तो’ फोन अन् पोलिस यंत्रणेची धावपळ | पुढारी

बीड ; शाळेत बॉम्‍ब ठेवल्‍याचा 'तो' फोन अन् पोलिस यंत्रणेची धावपळ

नेकनूर, मनोज गव्हाणे आपत्‍कालीन ११२ क्रमांकावर एक कॉल आला. यामध्ये शाळेमध्ये बाँम्‍ब ठेवल्‍याचे सांगण्यात आले. या वाक्‍याने पोलिस यंत्रणा तात्‍काळ कामाला लागली. या कॉलने बीड तालुक्‍यातील ससेवाडीत तब्‍बल तीन तास पोलिस यंत्रणा ॲक्‍टीव्ह मोडवर आली. एका मुलाने खेळताना डायल केलेल्‍या कॉलमुळे अन् बॉम्‍बच्या त्‍या वाक्‍याने पोलिसांची मात्र चांगलीच धावपळ उडाली.

या विषयी अधिक माहिती अशी की, नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ससेवाडी येथील बारा वर्षाचा एक मुलगा मामाकडे मांजरसुंबा येथे रहायला आहे. या मुलाने आजीचा मोबाईल घेत 112 या आपत्कालीन क्रमांकावर कॉल केला. अन् ससेवाडी च्या शाळेत बॉम्ब ठेवला आहे एवढे बोलून फोन कट केला. यामुळे नेकनूर पोलीस, बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथक यांनी ससेवाडी गाठली. पोलिसांनी बाँम्‍बच्या शोधासाठी शाळेचा संपूर्ण परिसर पिंजून काढला, मात्र कुठेच काही आढळले नाही. त्यामुळे यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला.

यानंतर पोलिसांनी कॉल केलेल्या मोबाईल क्रमांकाचा शोध घेतला. तेंव्हा त्‍यांना हा कॉल एका भोळसट मुलाने केल्‍याचे लक्षात आले. पोलिसांनी मांजरसुंबा येथील या मुलासह आजी आणि मामाला नोटीस देऊन सोडून दिले. मात्र या प्रकाराने पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक झाली.

हेही वाचा :  

Back to top button