बीड: पोखरी येथे पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला

गेवराई : पुढारी वृत्तसेवा : जुने भांडण मिटविण्यासाठी बोलावलेल्या बैठकीतच अकरा जणांनी संगणमत करुन एका तरुणाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून आणि लाठ्या काठ्याने जबर मारहाण केली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला. तर अन्य तीन जण किरकोळ जखमी झाले. ही घटना गेवराई तालुक्यातील पोखरी येथे मंगळवारी रात्री १० च्या सुमारास घडली. जखमी तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील पोखरी येथील सर्फराज बनेमिया शेख हा चार दिवसांपूर्वी मस्जिदीत नमाज पठण करण्यासाठी गेला होता. यावेळी त्याचे गावातीलच काही तरुणाशी वाद झाला होता. यावेळी सर्फराज याच्या हाताला दुखापत झाल्याने त्याने याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. दरम्यान पोलिसांनी उपचारासाठी पत्र दिल्याने तो जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला.
दरम्यान, रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर काही मौलानाच्या उपस्थितीत मंगळवारी पोखरी येथील मस्जितमध्ये सदरील भांडण मिटवण्यासाठी मंगळवारी रात्री बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीत पुन्हा मागील भांडणाची कुरापत काढून रफिक बशीर शेख, शफिक नसीर शेख, मोहिजीन शेख, जावेद इमान शेख, जाफर उस्मान शेख, आब्बास हमीद शेख, मोहिन शेकनूर शेख, सोहेल हमीद शेख, तौफिक रशीद शेख, वसीम यासीन शेख, अरमान शेख यांनी संगणमत करुन सर्फराज शेख याला लाठ्या काठ्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी सरताज बनेमिया शेख, बनेमिया शेख, नौशाद सलीम शेख यांना देखील मारहाण करण्यात आली असून यामध्ये सर्फराजच्या डोक्यात कुर्हाडीचा जबर घाव लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. दरम्यान सर्फराज याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बुधवारी सकाळी गेवराई पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन गंभीर जखमी असलेल्या सर्फराज याचा जवाब नोंदवला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
हेही वाचा