धाराशिव: दीड लाखाची लाच घेताना ‘सहायक रचनाकार’ लाचलुचपतच्या जाळ्यात | पुढारी

धाराशिव: दीड लाखाची लाच घेताना 'सहायक रचनाकार' लाचलुचपतच्या जाळ्यात

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा: तीन एकर जमीन अकृषी करण्यासाठी सहा लाख रुपयांची लाच मागणार्‍या सहायक रचनाकारास दीड लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. ही कारवाई आज (दि.२९) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. जिल्ह्यात पंधरा दिवसांतली ही तिसरी कारवाई आहे.

पोलिसांनी सांगितले की, सिंदफळ (ता. तुळजापूर) शिवारातील तीन एकर जमीन अकृषी करण्यासाठी तक्रारदाराने प्रस्ताव दाखल केला होता. हा प्रस्ताव तात्पुरता मंजूर करण्यासाठी सहायक रचनाकार मयुरेश माणिकराव केंद्रे (वय 30) याने सहा लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यावर तडजोड होऊन पाच लाख रुपये ठरले होते. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार लावलेल्या सापळ्यात बुधवारी (दि. 29) सहायक रचनाकार केंद्रे याला पहिल्या टप्प्यातील दीड लाख रुपयांची लाच स्वीकारत असताना अटक करण्यात आली.

उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे, पोलिस निरीक्षक विकास राठोड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या विभागाने पंधरा दिवसांत सलग तिसरी कारवाई करीत जिल्ह्यातील लाचखोरांना इशारा दिला आहे. गेल्या आठवड्यात सरपंच पतीस एक लाखाची तर एका पोलिस पाटलास 70 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती.

संबंधित बातम्या

हेही वाचा 

Back to top button