

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळात विद्यार्थ्यांची शैक्षणिकदृष्ट्या झालेली हेळसांड लक्षात घेत आता विद्यार्थ्यांची अध्ययन पातळी तपासली जाणार आहेत. या सर्वेक्षणातून येणार्या निष्कर्षांना अनुसरुन राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद पुढे आवश्य ते बदल करणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील २६६ शाळा निश्चित केल्या असून यात मराठी व गणित विषयांची परिक्षा १७ मार्च रोजी होणार आहे. या निवडलेल्या शाळांमध्ये प्रत्येक ३० विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहे, अशी माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सूत्रांनी दिली.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दर तीन वर्षांतून एकदा राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला जातो. त्यासाठी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी म्हणजेच 'नॅस' (National Achievement Survey) परीक्षेचे आयोजन केले जाते. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या वतीने राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण चाचणी घेतली जाणार आहे. ही चाचणी तिसरी, पाचवी व आठवी या वर्गातील विद्यार्थ्यांची घेतली जाणार आहे.
या परीक्षेसाठी जिल्ह्यातील २६६ शाळांची निवड राज्य स्तरावरून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील इयत्ता तिसरीसाठी ६८, पाचवीसाठी १०० व आठवीसाठी ९८ विद्यार्थी परीक्षा देतील. यासाठी तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली तालुका समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल. या ४५ बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत. तर परिक्षेतून विद्यार्थ्यांना येणार्या अडचणी, त्यावर मात कशी करता येईल बाबत उपाययोजना सुचविल्या जाणार आहेत.
हेही वाचा