धाराशिव : शेतकऱ्यांना आता धान्याऐवजी मिळणार अनुदान | पुढारी

धाराशिव : शेतकऱ्यांना आता धान्याऐवजी मिळणार अनुदान

उमरगा (जि धाराशिव), पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील केशरी (एपीएल) शिधा पत्रिकाधारक शेतकऱ्यांना आता धान्या ऐवजी प्रति लाभार्थी १५० रूपये थेट बॅक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. त्यानुसार बँक खात्यात दरमहा ७० लाख ६२ हजार ६०० रूपयांचे अनुदान जमा केले जाणार आहे. सदरची रक्कम जानेवारी महिन्यापासून पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. याची प्रक्रिया सुरू झाली असून आवश्यक कागदपत्रे स्वस्त धान्य दुकानदार किंवा तलाठी यांच्याकडे जमा करण्याचे प्रशासनाने अवाहन केले आहे.

शासनाने दुष्काळी भागातील शेतकर्यासाठी रेशन दुकानातून स्वस्त धान्य देण्याची योजना सुरू केली होती. परंतू काही महिन्यात धान्य बंद करण्यात आले होते. बंद केलेले धान्य पुन्हा वाटप करण्याची मागणी सातत्याने  केली जात होती. शासनाने १४ शेतकरी आत्महत्या जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्यांना जानेवारी महिन्यापासून प्रत्येक महिन्याला १५० प्रमाणे रोख रक्कम थेट हस्तांतरण करण्याची योजना कार्यान्वित केली आहे. जानेवारी २०२३ पासून ची रक्कम शेतकर्याना मिळणार आहे. या योजनेअंतर्गत उमरगा तालुक्यातील एकूण १० हजार ९१५ कार्ड धारक पात्र आहेत. तर एकूण ४७ हजार ८४ लाभार्थी संख्या आहे.

या सर्व लाभार्याना याचा लाभ होणार असून बँक खात्यात दरमहा ७० लाख ६२ हजार ६०० रूपयांचे अनुदान जमा केले जाणार आहे. यासाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता शासनाने विहित केलेल्या नमुन्यात शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांची माहिती, शिधापत्रिकेच्या पहिल्या व शेवटच्या पानाची छायांकित प्रत, महिला कुटुंब प्रमुखांचे बँक पासबूक, आधार कार्ड, सदस्यांच्या आधार कार्डची छायांकित प्रत व सात बारा ही कागदपत्रे स्वस्त धान्य दुकानदार किंवा तलाठी यांच्याकडे जमा करण्याचे प्रशासनाच्या वतीने अवाहन करण्यात केले आहे.

Back to top button