‘बीआरएस’ महाराष्ट्रात निवडणूक लढवणार; के. चंद्रशेखर राव यांची घोषणा | पुढारी

'बीआरएस' महाराष्ट्रात निवडणूक लढवणार; के. चंद्रशेखर राव यांची घोषणा

नांदेड, पुढारी वृत्तसेवा: सरकारला नमवायचे असेल, तर शेतकऱ्यांनी एकत्र येवून आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपली ताकद दाखवून द्यावी. बीआरएस राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी लोहा येथे झालेल्या सभेत केली. यावेळी त्यांनी अबकी बार …किसान सरकारचा नारा बुलंद केला.

लोहा येथील बैल बाजार मैदानावर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार बी. बी. पाटील, आमदार बलका सुमन, आमदार शकील आमेर, आमदार जीवन रेड्डी, हिमांशू तिवारी, माजी आमदार शंकर धोंडगे, माजी खा. हरीभाऊ राठोड, माजी आ. हर्षवर्धन जाधव, सुरेश गायकवाड, नागनाथ घिसेवाड, दिलीप धोंडगे, शिवराज धोंडगे, दत्ता पवार, जाकेर चाऊस, संजय कर्हाळे, अॅड. विजय धोंडगे, डॉ. सुनील धोंडगे, प्रा. यशपाल भिंगे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले की, देशात पाणी, वीज मुबलक प्रमाणात उपलब्ध असतानाही आजपर्यंतच्या कोणत्याच सरकारने शेतकऱ्यांना या बाबी उपलब्ध करून दिल्या नाहीत. अनेक सरकारे आली व गेली. अनेक पंतप्रधान, मुख्यमंत्री आले आणि गेले. परंतु, शेतकऱ्यांची अवस्था सुधारली नाही. आता शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपली ताकद दाखविण्याची वेळ आली आहे.

नांदेडमध्ये एक सभा झाली, तर इथले सरकार धास्तावले असून सहा हजार रूपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. ही मदत अपुरी असून 10 हजार रूपयांची मदत द्यावी, शेतकऱ्यांना भिक नको हक्काची मदत द्या, तेलंगणासारख्या राज्यात शेतकऱ्यांना 24 तास पाणी, वीज दिली जाते, अनेक योजना त्यांच्यासाठी राबविल्या जातात. तेलंगणात हे शक्य आहे, मग महाराष्ट्रात का नाही, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

महाराष्ट्र सर्व दृष्टीने समृध्द आहे. धनाची इथे कमतरता नाही, पण शेतकऱ्यांसाठी आवश्यक त्या बाबी देण्यासाठी इथल्या सरकारच्या मनात नाही. सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे. जातीवाद, धर्मवाद सोडून शेतकऱ्यांनी एकत्र येत आपली ताकद दाखवून द्यावी, सरकार आपल्या मागे येईल, आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपली एक झलक दाखवून द्या, सरकार नमल्या शिवाय राहणार नाही. असे ते यावेळी म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात काम करावे, महाराष्ट्रात त्यांचे काय काम, असे वक्तव्य केले होते. यावर शेतकऱ्यांना एकरी 10 हजार रूपये, चोवीस तास पाणी, वीज द्या, मी महाराष्ट्रात येणार नाही. जोपर्यंत या बाबी शेतकऱ्यांना मिळणार नाहीत, तोपर्यंत मी महाराष्ट्रात येणार, अशा शब्दांत के. चंद्रशेखर राव यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा 

Back to top button