नांदेड : केंद्र शासनाच्या एकाधिकारशाहीचा देगलूरात काँग्रेसच्या वतीने निषेध | पुढारी

नांदेड : केंद्र शासनाच्या एकाधिकारशाहीचा देगलूरात काँग्रेसच्या वतीने निषेध

देगलूर; पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासनाने द्वेषभावनेतून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याची कारवाई केली आहे. लोकशाही मोडीत काढण्याचा हा प्रकार असून या घटनेचा नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करीत भाजप विरोधी घोषणा दिल्या.

देगलूर येथील डॉ. आंबेडकर चौकात काँग्रेसच्या वतीने केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख बळेगावकर व श्रीमती शितलताई अंतापूरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात केंद्र शासनाने राहुल गांधी यांच्या विरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध केलेल्या वक्तव्यावरून सुरत येथील न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीत खासदार राहुल गांधी यांना दोषी ठरवून त्यांना दोन वर्षांची शिक्षा दिली. या निर्णयाला वरच्या कोर्टात अर्थात उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी न्यायालयाने वेळही दिला आहे. त्यानंतर या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात जाणार असल्याचे राहुल गांधी यांनी जाहीर केले होते. त्यामुळे उच्च न्यायालय या निर्णयाला स्थगिती देते काय, याची प्रतीक्षा न करताच केंद्र सरकारतर्फे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही कारवाई म्हणजे भाजची द्वेषभावनेतून केलेली कारवाई असल्याची प्रतिक्रिया यावेळी श्री शिवाजीराव देशमुख बळेगावकर यांनी दिली.

यावेळी तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष ॲड. प्रीतम देशमुख ,श्रीमती शितलताई अंतापूरकर, अल्पसंख्यांक सेलच्या अध्यक्षा शेख फिरदोस बेगम, माजी सभापती माधवराव मिसाळे ,माजी नगराध्यक्ष शंकरराव कंतेवार ,मोगलाजी शिरसेटवार, डॉ. विजयकुमार धुमा़ळे,हणमंतराव पाटील अंतापूरकर, जनार्दन बिरादार, प्रशांत पाटील आचेगावकर,बालाजीराव थडके, अनिल बाेनलावार, सुशिलकुमार देगलूरकर, राजाराम कांबळे ,शंकरराव भाटापुरकर, सादिक मरखेलकर, घुळेकर देसाई ,सय्यद गुरुजी , मोरे, एकनाथ टेकाळे ,यादवराव पाटील हावरगेकर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

केंद्र सरकारने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन केलेले हे राजकारण असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटत आहे. या देशात कोणी जनतेचा आवाज उचलू नये, आपल्याविरूद्ध बोलू नये, असाच त्यांचा डाव आहे. हा सारा प्रकार लोकशाहीचा गळा घोटण्याचा असल्याचा प्रकार कदापि सहन केला जाणार नसल्याची प्रतिक्रिया माजी पंचायत समिती सदस्य ॲड.प्रीतम देशमुख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

Back to top button