मुंबई / चंदीगड; वृत्तसंस्था : 'वारिस पंजाब दे' संघटनेचा म्होरक्या आणि खलिस्तानवादी अमृतपाल सिंग महाराष्ट्रात येण्याची शक्यता ध्यानात घेऊन नांदेडसह काही शहरांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. नांदेड शहरातून येणाऱ्या जाणाऱ्यांवर पोलिस नजर ठेवून असून, एटीएसलाही सतर्क करण्यात आले आहे. दरम्यान, पंजाब पोलिसांना गुंगारा देऊन अमृतपाल हरियाणात पोहोचल्याचे समोर आले आहे.
अमृतपाल सिंगच्या शोधासाठी गेल्या पाच दिवसांपासून पंजाब पोलिस जंग जंग पछाडत असले, तरी त्यांना स्थानिकांच्या मदतीने गुंगारा देण्यात अमृतपाल यशस्वी झाला आहे. तो पंजाबच्या बाहेर पडल्याचे समोर आले असून, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नांदेडसह काही शहरांत अलर्ट देण्यात आला आहे. नांदेड हे हुजूरसाहिब गुरुद्वारामुळे शिखांचे पवित्र तीर्थस्थळ आहे व नांदेडला दिल्लीहून थेट रेल्वे सेवा असल्याने खासकरून नांदेडला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक पोलिस नांदेडमध्ये येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येकावर बारीक नजर ठेवून असून, एटीएसलाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंजाब पोलिसांकडून अमृतपालबाबत लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली असून, त्याची विविध वेशातील छायाचित्रेही सगळीकडे पाठवण्यात आली आहेत. त्याने आता दाढी व डोक्यावरचे केसही कमी केले असून, ते छायाचित्रही जारी करण्यात आले आहे.
पंजाबचे हजारो पोलिस मागावर असूनही अमृतपाल त्यांना गुंगारा देत निसटला. तो आता हरियाणात दिसल्याचे समोर आले आहे. हरियाणातील कुरुक्षेत्र येथे शहाबाद भागातील सिद्धार्थ कॉलनीतील बलजीत कौर या महिलेच्या घरी तो आणि त्याचा साथीदार पपलप्रीत सिंग दोन दिवस थांबले होते. हरियाणा पोलिसांनी बलजीत कौरला अटक केली आहे. दुसरीकडे, पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपालने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी केस कमी केले आहेत व दाढीही कापली आहे. त्याचे विविध अवतारातील फोटो जारी करण्यात आले आहेत. पोलिस महानिरीक्षक सुखचैनसिंग गिल यांनी सांगितले की, अमृतपालने अनेक वाहने बदलली. त्याने दोन दुचाकीही चोरल्या. तसेच बैलगाडी, रिक्षातून प्रवास करत तो पोलिसांचा ससेमिरा चुकवत आहे. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो तीनचाकी मालवाहू रिक्षात मागे मोटारसायकलसह दिसत आहे.