परभणी: शेलमोहा ग्रा.पं.तील आर्थिक अनियमितता प्रकरण; माजी सरपंच, अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल | पुढारी

परभणी: शेलमोहा ग्रा.पं.तील आर्थिक अनियमितता प्रकरण; माजी सरपंच, अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा : गंगाखेड तालुक्यात शेलमोहा ग्रामपंचायतीच्या १४ वा वित्त आयोग, ग्रामनिधी व विविध विकास योजना, पंचायत समिती सेस, नरेगा इत्यादी कामांचे अभिलेखे न दाखवणे. विविध विकासकामांच्या प्रत्यक्ष तपासणीअंती जादा उचलण्यात आलेल्या रकमेचा समावेश करून आर्थिक अनियमितता करून कर्तव्यात कसूर केली. या प्रकरणी तालुक्यातील ६ अधिकारी, कर्मचारी व तत्कालीन माजी सरपंचावर  पिंपळदरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.२५) गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ३१ जानेवारी रोजी गंगाखेड बीडीओंना पत्र पाठवत तालुक्यातील शेलमोहा ग्रामपंचायतची तत्कालीन ग्रामसेवक (सध्या सेवानिवृत्त) एम. एन. खाडे, तत्कालीन सरपंच लक्ष्मीबाई शेषराव घोबाळे, तत्कालीन पॅनल तांत्रिक अधिकारी (नरेगा) सुधाकर महादेव बहिर, तत्कालीन ग्राम रोजगार सेवक (नरेगा) प्रदीप सुनील मुंडे, तत्कालीन ग्रामसेवक एस. डी. पांडे (सध्या कार्यरत पं. स. मानवत), गंगाखेड पंचायत समितीचे शाखा अभियंता एम. पी. डाके या ६ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

पाठवत १४ व्या वित्त आयोगातील ग्रामनिधी व विविध विकास कामे योजना, पं.स. सेस, नरेगा इत्यादी कामांचे अभिलेखे न दर्शविणे. तसेच विविध कामांच्या प्रत्यक्ष तपासणीअंती जादा उचलण्यात आलेला रकमेचा समावेश करणे, सार्वजनिक विहिरीचे काम योग्य जागेवर न करता (बुडीत क्षेत्रात), स्वतःच्या खासगी जागेत करणे. प्रत्यक्ष कामापेक्षा जास्त मूल्यांकन करून घेणे. विविध कामांचे खोटे मूल्यांकन करणे, याबाबत संयुक्त चौकशी समितीने आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवला. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित सर्व प्रकरणांचा मुद्देनिहाय खुलासा सात दिवसाच्या आत गंगाखेड बीडीओ यांनी करून स्वयं स्पष्ट अहवाल देण्याचे आदेश दिले होते.

याप्रकरणी परभणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने प्राधिकृत अधिकारी म्हणून गंगाखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण यांनी शुक्रवारी (दि. २४) पिंपळदरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून शनिवारी (दि.२५) सायंकाळी उशिरा संबंधित ६ जणांविरोधात शासनाची आर्थिक फसवणूक व दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपळदरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे करीत आहेत.

खुलासा देऊनही तत्कालीन महिला सरपंचावर गुन्हा दाखल

संबंधित प्रकरणात तत्कालीन महिला सरपंच लक्ष्मीबाई शेषराव घोबाळे यांनी २२ मार्चरोजी गंगाखेड पंचायत समिती बीडीओंना शपथपत्र सादर केले. यात आपण निरक्षर व अशिक्षित असल्याने तत्कालीन उपसरपंचांनी कारभार चालवला. आणि आपले नाव व सहीचा गैरवापर केला. तसेच या आर्थिक अनियमिततेत आपला प्रत्यक्ष संबंध नाही, असा लेखी खुलासा केला होता. मात्र, त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा 

Back to top button