हिंगोली: दरोड्याच्या तयारीतील चौघे जेरबंद : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई | पुढारी

हिंगोली: दरोड्याच्या तयारीतील चौघे जेरबंद : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: शहरालगत लिंबाळा शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना स्थानिक गु्न्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून खंजीर, सुरा, लोखंडी रॉड, वीस फुट दोरी जप्त केले. तर अन्य दोघे जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात आज (दि. २४) पहाटे गुन्हा दाखल झाला आहे.

शहरालगत लिंबाळा मक्ता भागात काही जण संशयास्पद स्थितीत फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार संभाजी लकुळे, भगवान आडे, सुनील अंभोरे, गजानन पोकळे, शेख शकील, किशोर सावंत यांच्यासह पथकाने गुरुवारी रात्री शोध मोहीम सुरु केली होती.

दरम्यान, रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास सहा जण संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. तर दोघे जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चौघांकडून एक खंजीर, एक सुरा, एक लोखंडी रॉड, वीस फूट दोरी व इतर साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक घेवारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संजय उर्फ काळ्या काळे, करण पवार, सुनील काळे, मधुकर काळे (सर्व रा. लिंबाळा मक्ता), विजय काळे, रामा चव्हाण (रा. देवाळा) यांच्या विरुध्द हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

यामध्ये संजय काळे व करण पवार यांना ऑगस्ट 2021 मध्ये दोन वर्षासाठी हिंगोली जिल्हयातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून ते हिंगोली जिल्हयात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणाचा पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे, उपनिरीक्षक संजय केंद्रे, संतोष वाठोरे, आकाश पंडीतकर पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button