हिंगोली : आखाडा बाळापूर येथील दुकानातून ३ लाखांचे सोयाबीन चोरीस | पुढारी

हिंगोली : आखाडा बाळापूर येथील दुकानातून ३ लाखांचे सोयाबीन चोरीस

आखाडा बाळापूर, पुढारी वृत्तसेवा : येथील बाजार समिती मैदानासमोरील भुसार मालाच्या दुकानातून सोमवारी (दि.२०) रात्री उशिरा दुकानाचे शटर उचकटून ६० क्विंटल सोयाबीन चोरट्यांनी होतोहात लांबविले. परिसरात सकाळी साडेचार ते पाच वाजेपर्यंत पोलीस गाडी गस्त घालत असते. तरीही सोयाबीनची चोरी होणे म्हणजे पोलिसांना चोरट्यांनी दिलेले खुले आव्हानच आहे. यापूर्वी परिसरात किरकोळ चोरीचे प्रकार घडले आहेत. काही दिवसांपूर्वी किराणा दुकानातून तेलाच्या टाक्या चोरट्यांनी पळविल्या होत्या.

आखाडा बाळापूर बाजार समितीसमोर गजानन कंठवार यांचे भुसार मालाचे दुकान आहे. या दुकानाचे शटर लोखंडी पारीच्या साह्याने उचकटून चोरी झाल्याचे गजानन कंठवार यांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साठ क्विंटल सोयाबीन गाडीमध्ये भरण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात, अशी हमालांची प्रतिक्रिया आहे. तरीही गस्त घालणाऱ्या पोलिसांना याचा सुगावा न लागणे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या चोरीमुळे व्‍यापारी वर्ग धास्तावला आहे.

हेही वाचा :  

Back to top button