हिंगोली : वसमतमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हळदीचे सौदे; ७ हजार २११ रूपयांचा भाव | पुढारी

हिंगोली : वसमतमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हळदीचे सौदे; ७ हजार २११ रूपयांचा भाव

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : सांगलीनंतर हिंगोली व वसमत बाजारपेठ हळदीसाठी राज्यभर ओळखली जाते. आज (दि. २२) वसमत येथील मोंढ्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तब्बल सात हजार पोत्यांची आवक झाली होती. नव्या हळदीला जास्तीत जास्त ७ हजार २११ रूपयांचा भाव मिळाला. हा दर कायम राहावा, अशी अपेक्षा शेतकर्‍यांनी व्यक्‍त केली आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड करण्यात येते. येथील हळद दर्जेदार असल्याने या हळदीला राज्यासह परराज्यात मोठी मागणी असते. लागवड क्षेत्राबरोबरच येथील बाजारपेठेतील उलाढालही मोठी आहे. हिंगोली व वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात वर्षाकाठी लाखो क्‍विंटल हळदीची खरेदी व विक्री होते. हिंगोली व वसमत येथे मराठवाड्यासह विदर्भातून हळद विक्रीसाठी आणली जाते. यंदा जवळपास ४९ हजार ७६३ हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड करण्यात आली आहे. दरवर्षी पाडव्याच्या मुहूर्तावर नव्या हळदीचे सौदे सुरू होतात. आज वसमत येथील मोंढ्यात ७ हजार क्‍विंटल हळदीची आवक झाल्याचे बाजार समिती प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. सध्या हळदीला सरासरी ६ हजार ५०० रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळत आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर मात्र हळदीला ७ हजार २११ रूपयांचा दर मिळाला आहे. हा दर अजूनही वाढावा अशी अपेक्षा शेतकर्‍यांमधून व्यक्‍त केली जात आहे. आगामी काळात येथील मोंढ्यात हळदीची आवक वाढणार आहे.

हेही वाचा :

Back to top button