Thackeray-Fadnavis : विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले एकत्र, चर्चांना उधाण | पुढारी

Thackeray-Fadnavis : विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले एकत्र, चर्चांना उधाण

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानभवन परिसरात शिवसेना-ठाकरे गटाचे मुख्य नेते उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आले. त्यामुळे या दोन्ही मोठ्या नेत्यांच्या एकत्र येण्यावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. यावर विधीमंडळाबाहेरुन माध्यमांशी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी या भेटीबाबत नेमकं काय घडलं याबाबत सांगितले. (Thackeray-Fadnavis)

उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, फडणवीस आणि मी योगायोगाने भेटलो. आमच्यामध्ये फक्त हाय, हॅलो एवढीच चर्चा झाली. तसेच सध्याच्या सरकारची कोणतीच प्रगती नाही असे म्हणत त्यांनी मराठा भाषा भवन बांधण्याच्या मुद्यावर मत व्यक्त केले. मराठी भाषा भवन बांधण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. हा मविआचा निर्णय होता. मात्र आताच्या सरकारने एक वीट देखील रचली नाही अशी टीका त्यांनी शिंदे सरकारवर केली. (Thackeray-Fadnavis)

दरम्यान, राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या दिवशी पार पडलेल्या सभेत ठाकरे गटावर टीका केली होती. यावर, जशी स्क्रिप्ट आली असेल तशी वाचली असेल अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्यावर केली होती.

विधानभवनात ठाकरे-फडणवीस यांचा एकत्र प्रवेश

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले असून एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. सभागृहात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीका केल्या जात आहेत. अशातच सभागृहाबाहेर वेगळेच चित्र पाहायला मिळाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांनी विधानभवनात एकत्र प्रवेश केला. या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे आता दोन्ही नेते पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा सध्या जोरदार सुरु आहे.

हेही वाचा

Back to top button