Fumio Kishida : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांची अचानक युक्रेनला भेट | पुढारी

Fumio Kishida : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांची अचानक युक्रेनला भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर  झेलेन्स्की यांची अचानक भेट घेतली. किशिदा स्थानिक वेळेनुसार मंगळवारी (दि.२१) दुपारी कीव येथे दाखल झाले. युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार उपमंत्री एमिने झेप्पा यांनी त्यांचे स्वागत केले. युक्रेनवरील रशियाचा हल्ला हा केवळ युरोपीयअंतर्गत बाब नाही, तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाच्या नियमांना आणि तत्त्वांना आव्हान देणारे आहे, असे किशिदा यावेळी म्हणाले. दरम्यान, किशिदा यांनी युक्रेनच्या राजधानीच्या उत्तरेकडील बुचा या शहराचा दौरा केला. या शहरावर रशियाने मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहेत.

एमिने झेप्पा म्हणाले की, जपानी पंतप्रधानांचे (Fumio Kishida) स्वागत करताना देशाला आनंद होत आहे. ही ऐतिहासिक भेट युक्रेन आणि जपानमधील एकता आणि मजबूत सहकार्याचे लक्षण आहे. आम्ही जपानच्या भक्कम पाठिंब्याबद्दल आणि आमच्या भावी विजयात योगदान दिल्याबद्दल त्यांचे आभारी आहोत.

दुसर्‍या महायुद्धानंतर रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले आहे. एखाद्या युद्धग्रस्त देशाला किंवा प्रदेशाला भेट देण्याची किशिदांची ही पहिलीच वेळ आहे. G 7 गटातील आशियाई सदस्याची आणि अमेरिकेच्या मित्राची युक्रेनची ही पहिली भेट आहे.

जपानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, किशिदांची युक्रेनची भेट झेलेन्स्कीच्या निमंत्रणावर होती. जपानने कीवसाठी भरीव मदत करण्याचे वचन दिले आहे. तसेच किशिदा युक्रेनला अतूट पाठिंबा व्यक्त करतील. त्याचबरोबर रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचा ठामपणे निषेध करतील, असेही निवेदनात म्हटले आहे. किशिदा गुरुवारी जपानला परतणार आहेत.

दरम्यान, किशिदाने यापूर्वी मॉस्कोच्या शेजारील देशावरील आक्रमणाविरुद्ध जोरदारपणे विरोध केला आहे. गेल्या महिन्यात रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याला एक वर्ष झाले. त्यानिमित्त जपानने युक्रेनला मानवतावादी मदत म्हणून $5.5 अब्ज देण्याचे वचन दिले आहे.

हेही वाचा 

Back to top button