हिंगोली ; हरभरा झाकण्यासाठी गेलेल्‍या शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्‍यू; पत्‍नी, २ मुले बचावली | पुढारी

हिंगोली ; हरभरा झाकण्यासाठी गेलेल्‍या शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्‍यू; पत्‍नी, २ मुले बचावली

हिंगोली ; पुढारी वृत्तसेवा सेनगाव तालुक्यातील शिंदेवाडी शिवारात शेतात हरभरा पीक झाकत असताना वीज कोसळली. यामध्ये तरुण शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना काल (मंगळवार) घडली. विलास शामराव गव्हाणे (वय 40, रा. शिंदेवाडी) असे शेतकऱ्याचे नाव आहे. सुदैवाने यावेळी पत्नी व दोन मुले दूर अंतरावर असल्याने ते बचावले.

हिंगोली जिल्हयात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. या पावसामुळे तसेच वादळी वाऱ्यामुळे गव्हाचे पीक आडवे पडले असून, संत्रा, मोवीज कोसळून मृत्‍यूसंबी तसेच आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे या फळपिकांचा सडाच शेतात पडला आहे. दरम्यान, काल (मंगळवार) सकाळी ढगाळ वातावरण व पाऊस सुरु असल्यामुळे शिंदेवाडी येथील शेतकरी विलास गव्हाणे हे त्यांची पत्नी व दोन मुलांसह शिंदेवाडी शिवारात असलेल्या शेतात हरभरा पीक झाकण्यासाठी गेले होते. यावेळी गव्हाणे हे हरभरा पिकाच्या सुडीवर ताडपत्री झाकत होते तर त्यांची पत्नी व दोन मुले दूर अंतरावर काम करीत होती. यावेळी अचानक विजेचा कडकडाट होऊन गव्हाणे यांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये ते गंभीररित्या भाजले गेले.

या घटनेची माहिती त्यांच्या पत्नीने गावात दिल्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गंभीररित्या भाजलेल्या गव्हाणे यांना उपचारासाठी रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहिर केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सेनगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजीत भोईटे, उपनिरीक्षक मुपडे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. मृत गव्हाणे यांच्या पश्‍चात आई, वडिल, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

हेही वाचा : 

Back to top button