बीड: ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना व्हायरल ताप; गेवराई परिसरात वाढते रूग्ण | पुढारी

बीड: ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना व्हायरल ताप; गेवराई परिसरात वाढते रूग्ण

गेवराई: गजानन चौकटे : पंधरा दिवसापासून गेवराई व परिसरातील वातावरण आजारांना निमंत्रण देणारे आहे. ऐन परीक्षेच्या दिवसात मुलांचे आजारपण वाढल्याने पालकांची चिंता वाढली आहे. काही घरात तर संपूर्ण कुटुंबच आजारी पडले आहे. अनेकांना पुन्हा पुन्हा खोकला, सर्दी, ताप आणि जुलाब या आजारांचा सामना करावा लागत आहे. वातावरणात सतत होणारे बदल नागरिकांच्या जीवावर उठले आहेत. सकाळी थंडी आणि दुपारी उष्मा अशा मिश्र वातावरणामुळे नागरिकांच्या रोग प्रतिकारशक्तीवर परिणाम होत आहे. त्यामुळे किरकोळ वाटणाऱ्या आजारांना अनेक जण सहज बळी पडत आहेत.

डॉक्टर लक्षणे बघून रूग्णांना औषध उपचार करत आहेत. सर्दी, खोकला असलेल्या नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे. सध्या शहराची हवा प्रदूषित झाल्याने श्वसन विकाराच्या व्याधी वाढण्याची शक्यता आहे. वातावरणातील बदलामुळे घशाची खवखव वाढत आहे. काही नागरिकांचा घसा लाल होऊन ताप येत आहे. ज्येष्ठ आणि लहान मुलांच्या आरोग्यावर लगेच परिणाम होत आहे. सर्दी खोकला असल्यास त्याकडे अनेकजण दुर्लक्ष करत आहेत. मिठाच्या कोमट पाण्याच्या गुळण्यासारखे घरगुती उपचार केले जात आहेत. तर काही नागरिक स्वतःहून मेडिकलमधून औषध घेत आहेत. मात्र, अशा प्रकारे औषध घेण्यापेक्षा डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

सर्दी, खोकला, ताप, जुलाब झाल्यास घाबरून न जाता नजीकच्या दवाखान्यात जाऊन वैद्यकीय उपचार करावेत. सध्या वातावरणातील बदलामुळे खवखव वाटत आहे. डॉक्टरांच्या सल्याने औषधे घ्यावीत.
– डॉ. रमीज अनिस शेख, उमापूर

दुपारी उष्मा व सकाळी थंडी या वातावरणातील बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. उन्हाळ्यात पाणी भरपूर प्यावे. म्हणजे जुलाब होत नाही. रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी उपाययोजना करावी. व वैद्यकीय उपचार घ्यावेत
-डॉ. राम दातार, गेवराई

हेही वाचा 

Back to top button