हिंगोली : रागावणार्‍या वडिलांच्या मानेवर अल्‍पवयीन मुलाकडून कुऱ्हाडीचा घाव | पुढारी

हिंगोली : रागावणार्‍या वडिलांच्या मानेवर अल्‍पवयीन मुलाकडून कुऱ्हाडीचा घाव

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा रागावणाऱ्या वडिलांच्या मानेवर कुऱ्हाडीचे वार करून अल्पवयीन मुलाने खून केल्याची धक्‍कादायक घटना हिंगोली जिल्ह्यात घडली. वसमत तालुक्यातील सेलु येथे ही घटना घडली. हा प्रकार लपविण्यासाठी अंत्यसंस्काराची तयारी सुरू करण्यात आली. मात्र, आज (मंगळवार) पहाटेच पोलिस घरी धडकले आणि सर्व प्रकार उघड झाला. या प्रकरणात पोलिसांनी मुलास ताब्यात घेतले आहे.

वसमत तालुक्यातील सेलु येथील भाऊराव पांडुरग कबले (वय ४२) हे कुटुंबियांसह राहतात. घरी पत्नी, तीन मुले असा परिवार असून, उदरनिर्वाहासाठी शेती नसल्याने कबले दांपत्य रोज मजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. भाऊराव व त्यांच्या अल्पवयीन मुलामध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरु झाला होता. यामध्ये त्यांच्या आईने मध्यस्थी केली होती. त्यानंतर रात्री भाऊराव बाजेवर झोपण्याच्या तयारीत असताना त्यांनी मुलास रागावण्यास सुरवात केली. वडिल रागावत असल्याने संतापलेल्या मुलाने हाताच कुऱ्हाड घेऊन बाजेवर असलेल्या वडिलांच्या मानेवर कुऱ्हाडीचा वार केला. यामध्ये भाऊराव यांचा मृत्यू झाला. अशी माहिती पोलिसांनी दिली.

घडलेल्या प्रकारामुळे कबले कुटुंबीय चांगलेच हादरून गेले. मात्र घडलेल्या प्रकाराची कुठेही वाच्यता न करता त्यांनी रात्र जागून काढली. त्यानंतर आज पहाटेच भाऊराव यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु केली मात्र, या घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, जमादार तुकाराम आम्ले, बालाजी जोगदंड यांच्या पथकाने सकाळी सहा वाजताच सेलु येथे जाऊन मृत भाऊराव यांचे घर गाठले. पोलिसांनी पाहताच घरातील मंडळीना घाम फुटला. पोलिसांनी सर्वांचीच चौकशी सुरु केली. त्यामध्ये मुलानेच वडिलांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील कारवाई सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button