हळदीसाठी प्रसिद्ध असलेल्या हिंगोलीला जगाच्या नकाशावर पोहोचवा: नितीन गडकरी | पुढारी

हळदीसाठी प्रसिद्ध असलेल्या हिंगोलीला जगाच्या नकाशावर पोहोचवा: नितीन गडकरी

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : देशात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे पसरविले जात असून त्यामुळे दळणवळण सोईचे झाले आहे. नव्याने मंजूर झालेल्या इंदौर-जबलपूर या राष्ट्रीय महामार्गामुळे विदर्भासह हिंगोली, नांदेड जिल्हयातील जनतेला मोठा फायदा होऊन या भागाचा नक्कीच विकास होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (दि.२५) येथे केले. रस्ते लोकार्पण झाल्यानंतर रामलीला मैदानावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार, खासदार हेमंत पाटील, खासदार भावना गवळी, आमदार संतोष बांगर, आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी खासदार ॲड. शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे यांच्यासह राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले की, मागील आठ वर्षात देशात 50 हजार कोटी रुपयांची रस्त्याची कामे झाली असून एकाही कंत्राटदाराला काम मंजुरीसाठी घरी येण्याची गरज पडू दिलेली नाही. मात्र रस्ता खराब केला. तर त्याला सोडलेही नाही. रस्त्यासाठी जनतेचा पैसा असून काम चांगलेच झाले पाहिजे, अशी आपली भूमिका आहे. माहूर येथे पुढील महिन्यात रोप-वे व इतर विकास कामांच्या भूमिपूजनासाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नव्याने मंजूर झालेल्या इंदौर-जबलपूर या मार्गामुळे विदर्भासह मराठवाडयातील हिंगोली, नांदेड जिल्हयांना मध्यप्रदेश व हैदराबादसाठी कनेक्टीव्हीटी मिळणार आहे. त्यामुळे उद्योग, व्यापार वाढण्यासाठी मदत होणार आहे.

लॉजेस्टीक पार्क उभारला जाईल, १०० एकर जागेवर हळद क्लस्टर उभे करून हळदीचे लोणचे, तेल, क्रीम, औषधी तयार करण्याचे उद्योग सुरु करावेत. त्यातून हिंगोली जिल्हा भारताच्याच नव्हे, तर जगाच्या नकाशावर पोहोचवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जिल्हयात नदी, नाल्यांचे खोलीकरण करून पाणी साठवणुकीला प्राधान्य दिले पाहिजे. आगामी काळात शेतकऱ्यांकडून डांबर तयार करण्याचे काम केले जाईल. तालुक्यातील नर्सी नामदेव येथे संत नामदेव महाराजांच्या मंदिराच्या रस्त्याला निधी मंजूर केला जाईल. नर्सी परिसरात पार्किंग प्लाझा, रेस्टॉरंट, निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करू. भेंडेगाव उड्डाण पुलासाठी ७५ कोटींचा निधी, बासंबा फाटा पुलासाठी २० कोटींचा निधी देण्याची घोषणा गडकरी यांनी यावेळी केली.

हेही वाचा 

Back to top button