हिंगोलीत फरार आरोपीला पकडताना गोळीबार; पोलीस अधिकारी गंभीर जखमी | पुढारी

हिंगोलीत फरार आरोपीला पकडताना गोळीबार; पोलीस अधिकारी गंभीर जखमी

कळमनुरी; पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी येथील इंदिरा नगर भागात मोक्का प्रकरणातील फरार आरोपींना पकडताना झालेल्या झटापटीत पोलिस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. त्यांच्यावर कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. बुधवारी (दि.२२) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेत शेख माजीद पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत.

कळमनुरी येथील इंदिरा नगर भागातील नऊ ते दहा जणांवर एक वर्षापूर्वी मोक्का लावण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी बबलुसिंग हत्यारसिंग टाक हा फरार होता. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली होती. शिवाय त्याच्या घरावर पाळत ठेवली होती. काही दिवसांपुर्वी रात्रीच्या वेळी तो घरी आला होता. मात्र पोलीस आल्याची कुणकुण लागताच अंधाराचा फायदा घेऊन तो फरार झाला.

दरम्यान, दुपारी तो घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, उपनिरीक्षक शेख जावेद, जमादार गजानन होळकर, जगन पवार, अरविंद राठोड, प्रशांत शिंदे, संजय राठोड, घ्यार, शशीकांत भिसे व गृह रक्षक दलाचे जवान असा सुमारे १० ते १२ जणांचा ताफा इंदिरानगर येथे गेला होता.

दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी बबलूसिंग याच्या घराला वेढा देऊन त्यास शरण येण्यास सांगितले. मात्र त्याने पोलिसांना न जुमानता पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. यावेळी चांगलीच झटापट झाली. या झटापटीमध्ये पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या जवळील पिस्टलमधून गोळीबार झाला. यामध्ये उपनिरीक्षक शेख माजीद जखमी झाले. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी बबलूसिंग याला ताब्यात घेतले.

यानंतर जखमी झालेल्या उपनिरीक्षक शेख माजीद यांना तातडीने उपचारासाठी कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविले. त्या ठिकाणी वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद मेने यांच्या पथकाने तातडीने त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक पंडीत कच्छवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, शिवसांब घेवारे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

बबलूुसिंग हा मोक्कातील आरोपी होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक गेले होते. यावेळी झालेल्या झटापटीमध्ये पिस्टलमधून गोळीबार झाला. त्यात उपनिरीक्षक माजीद जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नांदेडला हलविले आहे. बबलूसिंग याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल. तसेच या संपूर्ण प्रकरणाची उपाधिक्षकांमार्फत चौकशी करून त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.

हेही वाचा

Back to top button