हिंगोली: हळद संशोधन प्रकल्प २ वर्षात पूर्ण होणार : हेमंत पाटील | पुढारी

हिंगोली: हळद संशोधन प्रकल्प २ वर्षात पूर्ण होणार : हेमंत पाटील

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्तभाव मिळेल. त्याचबरोबर मालाला देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी मदत होणार आहे. व्यापाऱ्यांनाही हा प्रकल्प फायदेशीर असून किमान ४०० ते ५०० तरुणांना रोजगार मिळणार आहे. येत्या २ वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती हिंगोली जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील यांनी दिली.

कन्हेरगाव येथील (ता. वसमत, जि. हिंगोली) हळद संशोधन व प्रक्रिया केंद्राचा आज (दि.२४) प. पु. गुरुवर्य सूर्यकांत देसाई, हिंगोली जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. त्यानंतर खासदार पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते.
खासदार पाटील पुढे म्हणाले की, वसमत तालुका हे हळदीचे मोठे केंद्र आहे. संशोधन केंद्र झाल्यानंतर विविध राज्यातून येथे सर्व व्यापारी येतील. त्यामुळे शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची संमेलन होतील. केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे सर्व उपक्रम या एका संकुलामध्ये होणार आहे. वसमत शहराला आंतरराष्ट्रीय नकाशावर नेण्याचे काम हे संशोधन केंद्र करेल.

या प्रकल्पाविरोधात जाणीवपूर्वक काही शेतकऱ्यांना फूस मारली जात आहे की, की तुम्ही आत्मदहन करा. तसेच काही इशारेही दिले जात आहे. परंतु, हे सर्व शेतकरी बांधव आमचेच आहेत. त्यांच्या जमिनासाठी राज्य शासनाकडून निश्चितच मोबदला मिळवून दिला जाईल. यासंदर्भात एक बैठक अधीक्षक अभियंता यांच्याबरोबर घेतलेली आहे. त्यांच्याकडे शेतकऱ्यांना मावेजा दिलेला असल्याचे कागदपत्र आहेत. जे कोणी शेतकरी सुटलेले असतील, त्यांना मावेजा राज्य शासनाकडून मिळवून देऊ, असे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले.

हेही वाचा 

Back to top button