हिंगोली : पोलीस भरतीचे अमिष दाखवून तीन लाखांचा गंडा | पुढारी

हिंगोली : पोलीस भरतीचे अमिष दाखवून तीन लाखांचा गंडा

आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा : बोथी तालुका कळमनुरी येथे एका आदिवासी मुलीच्या आई-वडिलांची मुलीला पोलीस भरती करून देतो असे सांगून ३ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. एकता अकॅडमीच्या नागोराव सुखदेव श्रीरामे (रा. हनगदरी, ता. सेनगाव) यांच्या विरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी (दि २१)  फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, या घटनेत फसवणूक झालेल्या तरुणीचे नाव रंजना तुकाराम पोटे (वय २१ वर्षे, रा बोथी ता. कळमनुरी जि. हिंगोली) असे आहे. ही तरुणी औरंगाबाद येथे पोलीस भरतीपूर्व एकता अकॅडमी येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेत होती. या अकॅडमीतील श्रीरामे यांनी मुलीच्या आई-वडिलांना पोलीस भरती करुन देण्याचे आमिष दाखवून ३ लाख ९० हजार रुपये घेतले. त्यानंतर या आरोपीने संबंधित पालकांना कोणताही प्रतिसाद दिला नाही.

१७ ऑक्टोंबर २०२२ पासून ते १५ जानेवारी २०२३ पर्यंत आखाडा बाळापूर येथे पैसे उकळण्याचा कार्यक्रम श्रीरामे यांनी केला. मात्र त्यानंतर आरोपी श्रीरामे पैसे घेऊन नोकरी आणि पैसे यासंबंधीची कोणतीही माहिती वा प्रतिसाद देत नसल्याचे रंजना पोटे यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोटे यांनी आखाडा बाळापूर येथे नागोराव सुखदेव श्रीरामे यांच्याविरुद्ध तक्रार दिल्यानंतर त्याच्याविरुद्ध फसविणुकीचा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे हे करीत असून त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड हे मार्गदर्शन करीत आहेत.

Back to top button