हिंगोली : हजारो भाविकांनी घेतले नागेश्वराचे दर्शन

औंढा नागनाथ; पुढारी वृत्तसेवा: औंढा नागनाथ येथील तीर्थक्षेत्र आठवे ज्योतिर्लिंग नागेश्वराचे महाशिवरात्र पर्व काळात हजारो भाविकांनी दर्शन घेतले. अध्यक्ष डॉक्टर कृष्णा कानगुले, आमदार संतोष बांगर, ॲडव्होकेट अमोल जाधव यांनी सपत्नीक ‘नागेश्वर नागनाथ’ची महापूजा केली. यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. रात्रीपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.
२०२० आणि २०२१ यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे नियमांचे पालन करून महाशिवरात्र महोत्सव साजरा करण्यात आला होता. यावर्षी मात्र, कुठलाही निर्बध नसल्याने भाविकांनी दर्शनासाठी फार मोठी गर्दी करत मनोभावे दर्शन घेतले. करमणुकीचे साधने, खेळण्याची दुकान, आगास पाळणे, सिनेमागृहे, झुले, भांड्याचे दुकान इत्यादी गोष्टीकडे भाविकांनी मात्र कानाडोळा केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मंदिर परिसरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी यात्रा कालावधीमध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे तथा उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांना विशेष सूचना देऊन पोलीस बंदोबस्ताची पाहणी केली. नगरपंचायतीकडून शहरांमध्ये सर्वत्र व्यवस्था ठेवण्यात आली होती. यावर्षी महाशिवरात्री व शनी प्रदोष एकाच दिवशी आल्यामुळे विशेष पर्वणी समजली जाऊन हजारो भाविकांनी शिवाचे दर्शन घेतले.
हेही वाचा :