हिंगोली : तोतया अप्पर जिल्‍हाधिकाऱ्याकडे सापडल्‍या उत्‍तरपत्रिका; भरती प्रक्रियेतील मोठे रॅकेट उघडकीय येण्याची शक्‍यता | पुढारी

हिंगोली : तोतया अप्पर जिल्‍हाधिकाऱ्याकडे सापडल्‍या उत्‍तरपत्रिका; भरती प्रक्रियेतील मोठे रॅकेट उघडकीय येण्याची शक्‍यता

हिंगोली ; पुढारी वृत्‍तसेवा तोतया अप्पर जिल्हाधिकारी अमोल पजई-मराठे याच्याकडे सापडलेल्या ओएमआर उत्तरपत्रिका कोणत्या विभागाच्या भरती प्रक्रियेतील आहेत? याची तपासणी पोलिसांनी सुरु केली आहे. आरोपीला त्याच्या मुळगावी जामनेर (जि. जळगाव) येथे नेऊन चौकशी केली जाणार असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले. यातून फसवणुकीचे भरती प्रक्रीयेतील मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

हिंगोलीचे पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या सतर्कने अप्पर जिल्हाधिकारी म्हणून वावरणाऱ्या अमोल पजई याचा भांडाफोड झाला. या प्रकरणात तीन जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले, सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरी यांच्या पथकाने तपास सुरु केला आहे. दरम्यान, अमोल याच्या कारमध्ये काही ओएमआर उत्तरपत्रिका पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.

या उत्तरपत्रिका नेमक्या कोणत्या विभागाच्या भरती प्रक्रियेतील आहेत? त्या उत्तरपत्रिका त्याने कुठून मिळविल्या? भरती प्रक्रियेतील उमेदवारांची फसवणूक झाली काय? याचा तपास आता पोलिसांनी सुरु केला आहे. त्यासाठी पोलिसांचे पथक अमोल यास सोबत घेऊन जामनेर (जि. जळगाव) या त्याच्या मुळगावी जाणार आहे. या शिवाय त्याने कुठे वास्तव्य केले होते, त्या ठिकाणीही चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, अमोल पजई याच्याकडे त्याच्या पत्नीचे वन विभागातील अधिकारी असल्याचे ओळखपत्र सापडले. मात्र त्याच्या पत्नीने आपण वन विभागात नोकरीला नसल्याचे पोलिसांना सांगितले.

त्यामुळे या उत्तरपत्रिका वन विभागाच्या भरती प्रक्रियेतील असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मात्र या उत्तरपत्रिका बनावट की खऱ्या यावरच बरेच काही अवलंबून असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी तपासावर लक्ष ठेऊन वेळोवेळी अपडेट देण्याच्या सूचना तपास पथकाला दिल्या आहेत. या शिवाय तपास पथकाला आवश्‍यक मार्गदर्शन केले जात असून, यातून मोठ्या रॅकेटचा भांडाफोड होण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button