बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : टिपू सुलतानप्रमाणे विरोधी पक्षाचे नेते सिध्दरामय्या यांना ही संपवून टाका, असे वादग्रस्त वक्तव्य उच्च शिक्षण मंत्री अश्वत्थ नारायण यांनी जाहीर सभेत केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या वक्तव्यावरून विरोधी पक्षाकडून त्यांच्यावर सडकून टीका केली जात आहे.
अश्वत्थ नारायण याच्या वक्तव्याचा समाचार घेताना विराधी पक्ष नेते सिध्दरामय्या म्हणाले, बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांविरोधात मी काही बोलणार नाही. पोलिसांनी स्वयंप्रेरणेने गुन्हा दाखल करावा. महात्मा गांधीजींचा खून केलेल्याची पूजा करणाऱ्यांकडून प्रेम, दया, बंधुत्व याची अपेक्षा करणे शक्य आहे का? राज्यातील एका मंत्र्याकडून अशाप्रकारे वक्तव्य केल्यानंतरही पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. म्हणजे या राज्यातील सत्ताधारी जिवंत नाहीत. येथील सरकार मृत आहे, असाच याचा अर्थ आहे, अशी टीकाही सिद्धरामय्या यांनी केली.