भिगवण : किल्ल्यांच्या संवर्धनासाठी लढा उभारणार; संभाजीराजे यांचा राज्य सरकारला इशारा | पुढारी

भिगवण : किल्ल्यांच्या संवर्धनासाठी लढा उभारणार; संभाजीराजे यांचा राज्य सरकारला इशारा

भिगवण; पुढारी वृत्तसेवा : गडकोट किल्ल्यासाठी सी पोर्ट सर्किट टुरिझम करा, यासाठी आजी – माजी मुख्यमंत्र्यांना शेकडो पत्रे लिहली. मात्र, लोकांना फसविण्याचा प्रकार होत आहे. किल्ले संवर्धन व जतन करण्यासाठी सरकारचा एक पैसा नको. केवळ किल्ले आमच्या ताब्यात द्या, असा घणाघात माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केला. किल्ले संवर्धन व जतन करण्यासाठी सरकारने दोन-तीन महिन्यात निर्णय न घेतल्यास मोठा लढा उभारू, असा इशाराही भिगवण (ता. इंदापूर) येथे दिला.

संभाजीराजे भिगवण येथे राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेसाठी आले होते. या वेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, पुणे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग जगताप, राजकुमार मस्कर, छगन वाळके आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मोठ्या श्रद्धेने घेतले जाते. मात्र, ज्या किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, जिथे राज्याभिषेक झाला, महाराजांचा मृत्यू झाला त्या किल्ल्यांबाबत साधी चर्चा होत नाही. अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निमार्ण केले. मात्र, त्यांच्या कार्याची दखल घ्यायला सरकारला वेळ मिळत नसल्याची टीका त्यांनी केली.

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या जलपूजनासाठी सहा वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. आज सहा-सात वर्षे झाले तरीसुद्धा स्मारकाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यावेळी स्मारकाचे बजेट तीन हजार कोटी सांगण्यात आले होते. आज ते तीस हजार कोटीपर्यंत गेले आहे. एवढा पैसा सरकार कुठून आणणार ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जेथे अन्याय होतो तेथे न्याय देण्याकरिता, गरिबांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी स्वराज्य आहे. परंतु, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सुरुवातीची काही वर्षे सोडली तर सत्तर वर्षांमध्ये अवघा चौदा-पंधरा कोटींचा निधी किल्ल्यांसाठी खर्च करण्यात आला, अशी खंत ही त्यांनी व्यक्त केली.

बिघडलेल्यांना सरळ करणार
रायगड हे श्रद्धास्थान असल्याचे फक्त म्हटले जाते, परंतु त्याला जीवित ठेवण्याचा प्रयत्न केला जात नाही. आता स्वराज्याच्या माध्यमातून बिघडलेल्यांना सरळ करण्याचे काम करणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

Back to top button